शिंद्यात चोरट्यांचा धुमाकूळ! विहिरीवरील सोलर कॅमेरा अन् स्टार्टर लंपास”
सीसीटीव्हीत कैद झाला संशयित; शेतकऱ्याचे १७ हजार ९०० रुपयांचे नुकसान

कर्जत | कर्जत तालुक्यातील शिंदा शिवारात पुन्हा एकदा चोरट्यांनी शेतकऱ्याला लक्ष्य केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विहिरीवर बसवलेला सोलर सीसीटीव्ही कॅमेरा आणि इलेक्ट्रिक स्टार्टर अज्ञात चोरट्याने लंपास केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, चोरी करणारा संशयित सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला असून आता कर्जत पोलिसांसमोर चोरट्याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
या प्रकरणी शिंदा येथील शेतकरी राजेंद्र उत्तम सुद्रीक (वय ४५) यांनी कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या गट क्रमांक १५७ मधील शेतात विहिरीवर पाणबुडी मोटार बसवण्यात आली असून चोरीच्या घटनांमुळे खबरदारी म्हणून १३ एप्रिल रोजी सिमेंटच्या पोलवर सोलर सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आला होता.

मात्र ५ मे रोजी सकाळी पिकाला पाणी देण्यासाठी ते विहिरीवर गेले असता कॅमेरा गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी गावातील संपत घालमे यांना बोलावून पाहणी केली. यावेळी मुलगा विशाल सुद्रीक याने मोबाईलवर सीसीटीव्ही फुटेज तपासले असता २ मे रोजी मध्यरात्री १२:५५ वाजण्याच्या सुमारास एक अज्ञात इसम अंगावर पांढरी गोणी घेऊन कॅमेरा व स्टार्टर चोरून नेत असल्याचे स्पष्ट दिसून आले.
या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामीण भागातील शेतमाल, मोटारी आणि विद्युत साहित्य सुरक्षित आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिसांनी अज्ञात संशयिताविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला असून फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे.
“पूर्वीही दोनदा चोरी; सुद्रीक कुटुंब त्रस्त”
राजेंद्र सुद्रीक यांच्या शेतातील साहित्याची यापूर्वीही दोन वेळा चोरी झाली असल्याची माहिती समोर आली आहे. त्या प्रकरणीही कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. वारंवार होत असलेल्या चोरीमुळे सुद्रीक कुटुंब भयभीत झाले असून ही केवळ चोरी आहे की जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रकार, याचाही तपास होणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.
स्थानिक नागरिकांनी पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून संशयिताला तातडीने अटक करावी, अशी मागणी केली आहे.
▌चोरीस गेलेला मुद्देमाल
▪ ७,३५० रुपये – Secureye कंपनीचा सोलर लिंकेज सीसीटीव्ही कॅमेरा
▪ ८५० रुपये – मेमरी कार्ड व एअरटेल सिमकार्ड
▪ ९,७०० रुपये – हिरो कंपनीचा इलेक्ट्रिक स्टार्टर
▶ एकूण नुकसान : १७ हजार ९०० रुपये



