नांदगावचे उपसरपंच विजय शिंदे ‘समाजरत्न’ पुरस्काराने गौरविले


कर्जत (प्रतिनिधी) : – लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते, तर ते समाजातील वंचित आणि सामान्य माणसाच्या संघर्षाचे प्रतिनिधित्व करणारे युगप्रवर्तक विचारवंत होते. त्यांच्या लेखणीतून सामान्य माणूस साहित्याचा नायक बनला आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा मिळाली, असे प्रतिपादन दुसऱ्या सत्यशोधक अण्णा भाऊ साठे ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा माजी आमदार लहू कानडे यांनी केले.
कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयात कर्जत तालुका साहित्यप्रेमी मंडळ आणि दादा पाटील महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या सत्यशोधक अण्णा भाऊ साठे ग्रामीण साहित्य संमेलनात साहित्य क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. याच कार्यक्रमात नांदगावचे उपसरपंच व ख्यातनाम सामाजिक कार्यकर्ते विजय शिंदे यांना त्यांच्या सातत्यपूर्ण सामाजिक सेवेबद्दल प्रतिष्ठेचा ‘समाजरत्न’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी, जनकल्याणासाठी तसेच विविध सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत मान्यवरांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारताना विजय शिंदे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “हा सन्मान माझा एकट्याचा नसून संपूर्ण नांदगाव गावातील ग्रामस्थांचा आहे. समाजाच्या पाठिंब्यामुळेच मला सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा मिळाली असून, यापुढेही गाव व समाजासाठी अधिक जोमाने कार्य करत राहीन.” या सन्मानामुळे नांदगावसह परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या संमेलनाची सुरुवात सकाळी ९ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी भव्य ग्रंथदिंडी काढून झाली. या ग्रंथदिंडीत विद्यार्थी, साहित्यप्रेमी व नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला.
संमेलनाचे संयोजक प्राचार्य डॉ. संजय नगरकर व तानाजी डाडर होते. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. मच्छिंद्र सकटे यांच्या हस्ते झाले. कवी नितीन चंदनशिवे, स्वागताध्यक्ष चैतन्य उद्योग समूहाचे सर्वेसर्वा सुरेशजी गोरखे, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांतजी काळोखे, बाळासाहेब लोंढे, डॉ. बापू चंदनशिवे, सुनील गोसावी, भाऊसाहेब यादव, जगताप, यशवंत गायकवाड यांच्यासह अनेक साहित्यिक व मान्यवर उपस्थित होते.

यावेळी अण्णा भाऊ साठे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची सांगड घालून समाजात परिवर्तनाची लाट निर्माण करण्याची गरज वक्त्यांनी व्यक्त केली.
पुरस्कार सोहळ्यावेळी बाबासाहेब बागल, नानासाहेब म्हस्के, शिवसेना नेते अशोक वाळूंज माजी सरपंच दादासाहेब निंबाळकर माजी उपसरपंच भाऊसाहेब गुंड, माजी उपसरपंच अण्णासाहेब बागल, ग्रामपंचायत सदस्य पपुभाऊ जगताप, रावसाहेब बागल, भाऊसाहेब गायकवाड, आरपीआय अध्यक्ष दादासाहेब गायकवाड, माजी ग्रामपंचायत सदस्य दत्ता भालेराव, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष संजय जगताप, नाना शिंदे एच डिएफ सी अँग्री ऑफिसर पुणे दिपक गायकवाड, मेघराज जगताप, कुंडलिक जगताप, रामदास जगताप, दादा लोंढे, संजय विटकर, श्रीराम जगताप, संदीप पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेशजी गोरखे यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. विक्रम कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन नेटके सर यांनी मानले. या संमेलनामुळे कर्जत तालुक्यातील सांस्कृतिक आणि सामाजिक वातावरणात नवचैतन्य निर्माण झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.



