नांदगाव संघ ठरला ‘नांदगाव चषक 2025’ विजेता अटीतटीच्या अंतिम सामन्यात शिंदा संघावर 4 धावांनी विजय; नांदगाव संघाने मारली विजयी चौकार!


कर्जत (प्रतिनिधी) – नांदगाव क्रिकेट क्लब आयोजित ‘नांदगाव चषक 2025’ क्रिकेट स्पर्धेची रंगतदार सांगता शनिवारी (दि. 25 ऑक्टोबर) उत्साहात पार पडली. अंतिम सामन्यात नांदगाव संघाने अटीतटीच्या लढतीत शिंदा संघावर 4 धावांनी विजय मिळवत ‘नांदगाव चषक 2025’ चे विजेतेपद पटकावले.
ही स्पर्धा मंगळवार (दि. 21 ऑक्टोबर) रोजी सुरू झाली होती. एकूण 20 संघांनी सहभाग नोंदवत रोमांचक सामने रंगवले. पहिली, दुसरी आणि तिसरी फेरी पार केल्यानंतर अंतिम फेरीत नांदगाव व शिंदा संघामध्ये चुरशीचा सामना झाला.

शिंदा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. नांदगाव संघाने सात षटकांत 76 धावांचे तगडे आव्हान उभे केले. प्रत्युत्तरात शिंदा संघाने झुंजार खेळ केला, परंतु 77 धावांचे लक्ष्य गाठताना 73 धावांवरच गारद झाला. परिणामी नांदगाव संघाने 4 धावांनी विजय मिळवत नांदगाव चषक आपल्या नावावर केला. सोहेल सय्यद आणि स्वप्निल निकम यांच्या दमदार फलंदाजीमुळे नांदगाव संघाला विजय मिळवण्यात यश आले.
विजेत्या संघाला ₹31,000 रोख पारितोषिक आणि ट्रॉफी युवा उद्योजक महेश तनपुरे यांच्या सौजन्याने शरद तनपुरे यांच्या हस्ते देण्यात आली. तर दुसऱ्या क्रमांकाच्या शिंदा संघाला ₹21,000 चे बक्षीस डॉ. प्रविण जगताप यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तृतीय पारितोषिक ₹11,000 अंबीजळगाव संघाला आणि चतुर्थ पारितोषिक ₹5,500 मिरजगाव संघाला देण्यात आले.

स्पर्धेतील विविध वैयक्तिक पारितोषिकांचे सौजन्य दत्ता म्हस्के, विनोद गायकवाड, अतुल किराणा, लक्ष्मण जगताप, बाळासाहेब निंबाळकर, दीपक गायकवाड, समृद्धी अॅग्रोटेक, बागल सर्व्हिसेस कर्जत, घनशाम नेटके, नंदु पवार, सचिन पवार, दत्तात्रय गायकवाड आणि गणेश निंबाळकर यांनी केले. तसेच नाना जंजिरे, अशोक वाळुंज, माऊली गुंजाळ आणि आण्णा बागल यांनी विशेष सहकार्य केले.
स्पर्धेचे सुरळीत आयोजन करण्यासाठी कॅप्टन सलीम सय्यद, स्वप्निल विटकर, दत्ता बागल, स्वार्थिक गायकवाड, ओंकार निंबाळकर, प्रदिप जगताप, आलम सय्यद, कृष्णा गायकवाड, साहिल गायकवाड, सुरज गायकवाड यांनी संयोजक म्हणून मोलाचे योगदान दिले. सामन्यांची उत्कंठा वाढवणारी कॉमेंटरी जाणू वायसे आणि परशुराम बागल यांनी केली.

या स्पर्धेचे सामने पाहण्यासाठी परिसरातील ग्रामस्थ आणि क्रिकेटप्रेमींची मोठी गर्दी उसळली होती. शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या या सामन्यामुळे नांदगाव चषक 2025 स्पर्धा क्रिकेटप्रेमींसाठी अविस्मरणीय ठरली.



