कर्जत मध्ये लक्ष्मण हाके यांच्या बेताल वक्तव्याचा मराठा समाजाचा वतीने तीव्र निषेध


कर्जत, ता. 15 सप्टेंबर – मौजे शृंगारवाडी (जि. बीड) येथे झालेल्या सभेत लक्ष्मण हाके यांनी मराठा समाजातील मुलींविषयी केलेल्या बेताल वक्तव्याचा कर्जत तालुक्यात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. यासंदर्भात सकल मराठा समाज, कर्जत तालुका यांच्यातर्फे तहसीलदारांना लेखी निवेदन देऊन कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी शृंगारवाडी येथे झालेल्या सभेत लक्ष्मण हाके यांनी “आमच्या ओबीसी समाजातील 11 अविवाहित मुलांना मराठा समाजातील 11 मुली द्या” असे विधान केले. या विधानामुळे मराठा समाजातील मुलींचा अपमान झाला असून समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. तसेच हे वक्तव्य जातीय तेढ निर्माण करणारे असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात पुढील मागण्या केल्या आहेत :
लक्ष्मण हाके यांच्यावर मुलींची छेड काढल्याच्या प्रकरणात संबंधित कायद्यांनुसार कठोर कारवाई करावी.
समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर तातडीने गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी.
यापुढे अशा प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून प्रशासनाने काटेकोर दक्षता घ्यावी.
निवेदनाची प्रत पोलिस निरीक्षक, करजत यांनाही माहितीस्तव देण्यात आली आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे करजत तालुक्यात संतापाचे वातावरण पसरले असून, प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मराठा समाजाने स्पष्ट इशारा दिला आहे की, तातडीने कारवाई न झाल्यास मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्यात येईल.




