कर्जत पोलीस ठाण्यात ‘नक्षत्र सखी मंच’तर्फे रक्षाबंधन उत्सव उत्साहात; सलग पाचवे वर्ष उपक्रमाचे यश…


कर्जत (प्रतिनिधी): समाजात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी दिवस-रात्र कार्यरत असलेल्या पोलीस बांधवांप्रती कृतज्ञता आणि स्नेह व्यक्त करण्याच्या हेतूने ‘नक्षत्र सखी मंच’तर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कर्जत पोलीस ठाण्यात रक्षाबंधनाचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यंदा या उपक्रमाचे पाचवे वर्ष पूर्ण झाले.
रक्षाबंधन हा स्नेह, संरक्षण आणि विश्वासाचे प्रतीक असलेला सण आहे. या पार्श्वभूमीवर ‘नक्षत्र सखी मंच’च्या सदस्यांनी कर्जत पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना राखी बांधून शुभेच्छा दिल्या. “समाजात शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी पोलीस बांधव अहोरात्र तत्पर राहून आपले कर्तव्य बजावतात, त्याबद्दल त्यांचा सन्मान करण्याची ही आमची छोटीशी पण मनापासूनची भावना आहे,” असे स्वाती पाटील यांनी सांगितले.

या प्रसंगी स्वाती पाटील, शबनम मुंडे, वैशाली टकले, उज्वला शेळके, निर्मला खराडे, दिपाली समुद्र, मनीषा म्हेत्रे, मीरा जाधव, प्रमा गोंदकर, आरती टकले, शिल्पा माळवे या सर्व सदस्यांनी उपस्थित पोलीस बांधवांना राखी बांधली.
कार्यक्रमाला डीवायएसपी प्रवीण लोखंडे, पोलीस निरीक्षक सोपान शिरसाठ यांच्यासह कर्जत पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनीही ‘नक्षत्र सखी मंच’च्या या उपक्रमाचे कौतुक केले आणि समाजाशी असलेले आपले नाते अधिक दृढ करण्याचा संकल्प व्यक्त केला.

सलग पाच वर्षे अखंडपणे राबविला जाणारा हा उपक्रम पोलीस आणि नागरिक यांच्यातील स्नेह आणि परस्पर विश्वासाचे एक सुंदर उदाहरण ठरत असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले.



