उडदाच्या पसरल्या वेली; शेंगांचे प्रमाण खूपच कमी निकृष्ट बियाणे; कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांची फसवणूक; उत्पन्नात होणार मोठी घट

कर्जत : कर्जत तालुक्यातील सुमारे ३० गावातील शेतकऱ्यांनी विविध कृषी केंद्रातून कमी कालावधीत येणारे निर्मल सिड्स कंपनीचे उडीद बियाणे अत्यंत चांगले व उत्पन्न भरपूर असे सांगून शेतकऱ्यांच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन उडदाचे निकृष्ट प्रतिचे बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. निकृष्ट बियाणे देऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीला आला असून शेतकऱ्याच्या उत्पन्नात प्रचंड घट होणार असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कृषी विभाग या कृषी केंद्र चालकांवर काय कारवाई करणार की त्याला पाठीशी घालणार याकडे तालुक्याचे लक्ष लागलेले आहे. निकृष्ट बियाणामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे. काही प्रमाणात उगवले नाही आणि जे बियाणे उगवले ते वेलीसारखे पसरून उंच वाढले आहे. आज अखेरपर्यंत त्या उडदाला कमी फुले, कमी शेंग लागल्याने शेतकऱ्यांचे खूप प्रचंड नुकसान झाले आहे. निकृष्ट बियाण्यांमुळे शेतकऱ्यांकडून कृषी विभागावर नाराजी व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका तर बसत आहे. शिवाय निकृष्ट बियाण्यांमुळे शेतकऱ्यांची शेती पडीक राहत आहे.
मात्र कृषी विभागाकडून कृषी केंद्रावर कुठलीही कारवाई केली जात नाही. बोगस बियाणे देणाऱ्या कृषी केंद्राच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून योग्य ते कारवाई करावी, अशी
मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. काही बियाणे उगवत नाही तर काही बियाणे खराब निघत
असल्याने उत्पादनात घट येत आहे.याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. दरवर्षी बोगस बियाणे
कंपन्यांचा सुळसुळाट दिसून येते.तसेच सर्रास बोगस बियाण्यांची विक्री करणाऱ्या कृषी केंद्रांवर
कृषी विभागाकडून कुठली कारवाई होईल हे पाहण्यासारखे आहे. कृषी विभागाच्या चुकीच्या व दुर्लक्षित धोरणामुळे शेतकरी त्रस्त होत असल्याने शेतकऱ्यांच्यात संताप व्यक्त व्यक्त होत आहे.