कर्जत शहरात श्री संत सेना महाराज भव्य प्रवेशद्वाराचे उद्घाटन संपन्न

कर्जत : प्रजासत्ताक दिनाच्या शुभ मुहूर्तावर कर्जत शहरात नाभिक समाज बांधवांच्या अथक प्रयत्नांतून उभारले गेलेले श्री संत सेना महाराज भव्य प्रवेशद्वाराचे उद्घाटन नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष श्री बाळासाहेब भुजबळ यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा उषा राऊत होत्या, तर उपनगराध्यक्षा रोहिणी घुले, प्रतिभा भैलूमे, सुवर्णा सुपेकर, नामदेव राऊत, सचिन घुले, रविंद्र सुपेकर, सुनील शेलार आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच नाभिक महामंडळाच्या जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी व समाज बांधवांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हजेरी लावली.
नाभिक समाजाच्या संघटनाचे कौतुक
कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी नाभिक समाज बांधवांच्या एकीचे व कार्यकर्तृत्वाचे कौतुक केले. नाभिक समाजाच्या स्वखर्चातून तीन लाख रुपये खर्च करून हे भव्य प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. देणगीदारांमध्ये श्री बाळासाहेब भुजबळ यांनी 21,000 रुपये देऊन या कामाचा प्रारंभ केला होता. तसेच श्री आकाश कोकाटे (11,000), तुकाराम दळवी (5,000), पारस विश्वनाथ काशीद (5,000), अमोल पंडित (5,000) यांचा सन्मान करण्यात आला.
मान्यवरांचे मनोगत
श्री बाळासाहेब भुजबळ यांनी नाभिक समाजाच्या युवक-युवतींच्या शिक्षणासाठी भविष्यातही आर्थिक सहकार्य करण्याची ग्वाही दिली. कर्जत तालुक्याचे युवा नेते सचिन घुले पाटील यांनी समाजाच्या कार्याची प्रशंसा करून श्री संत सेना महाराज भवन उभारणीसाठी 51,000 रुपयांची देणगी जाहीर केली.
नगराध्यक्षा उषा राऊत यांनी आपल्या कार्यकाळात शहराच्या विकासात भर घालणाऱ्या या उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. प्रभाग क्रमांक 13 चे नगरसेवक रविंद्र सुपेकर यांनी नाभिक समाजाच्या एकीचे कौतुक करत भविष्यातील उपक्रमांसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतिश पंडित यांनी केले, तर सूत्रसंचालन शहराध्यक्ष नामदेव थोरात यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विश्वनाथ काशीद, दिलीप चौधरी, यशवंत थोरात, अमोल थोरात, किरण काशीद, संतोष थोरात यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हा सोहळा नाभिक समाजाच्या ऐक्याचे आणि त्यागाचे प्रतीक ठरला आहे.