बीड जिल्ह्यात दुसऱ्या सरपंचाचा मृत्यू

आंबाजोगाई (बीड) तारीख: 12 जानेवारी 2025 | वेळ: दुपारी 1:03 बीड जिल्ह्यात सरपंचांच्या मृत्यूचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. आंबाजोगाई तालुक्यातील सौंदाना गावाचे सरपंच अभिमन्यु क्षीरसागर यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने जिल्ह्यात पुन्हा एकदा हळहळ व्यक्त केली जात आहे.
अभिमन्यु क्षीरसागर हे दुचाकीवरून जात असताना राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेने कुटुंबीयांसह संपूर्ण गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
मागील महिन्यातील दुसरी घटना
बीड जिल्ह्यात सरपंचांच्या मृत्यूच्या घटना चिंताजनक ठरत आहेत. महिन्याभरापूर्वी मसाजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती. आता सौंदाना गावातील सरपंच अभिमन्यु क्षीरसागर यांच्या अपघाती मृत्यूमुळे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप आणि शोककळा पसरली आहे. अपघातानंतर टिप्पर चालक फरार झाल्याची माहिती असून पोलिस तपास सुरू आहे.
स्थानिक प्रशासनाला प्रश्नचिन्ह
जिल्ह्यात सरपंचांच्या वाढत्या दुर्दैवी घटनांमुळे प्रशासनावर टीका होत आहे. अभिमन्यु क्षीरसागर यांच्या अपघातानंतर नागरिकांमध्ये रस्त्यावरील सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.
या दुर्दैवी घटनेने बीड जिल्ह्याला हादरवून सोडले आहे, आणि प्रशासनाने यावर लवकरात लवकर उपाययोजना करणे आवश्यक आहे.