सोनाली मंडलिक ‘देवाभाऊ केसरी’ किताबाची मानकरी

नमो कुस्ती महाकुंभ २ अंतर्गत केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या वतीने नुकतेच करण्यात आले होते.
या कुस्ती स्पर्धेमध्ये भारतासह फ्रान्स, उजबेकिस्तान, रोमानिया, एस्टोनिया, मोल्डोवा, इराण, ब्राझील, जॉर्जिया असे जगभरातील नऊ देशांमधून नामवंत पैलवान तसेच जागतिक विजेते, ऑलिंपियन, हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी आणि उपमहाराष्ट्र केसरी सारखे महिला आणि पुरुष असे दिग्गज कुस्तीपटू सहभागी झाले होते.
भव्य अशा या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भारतातील नामांकित महिला कुस्तीपटू यांनी परदेशी मल्लाविरुद्ध आपली ताकद आजमावली. दादा पाटील महाविद्यालय, कर्जतची विद्यार्थिनी कुस्तीपटू सोनाली मंडलिक हिने युरोपमधील एस्टोनियाच्या मार्टा पाजूला पराभूत करून आंतरराष्ट्रीय कुस्ती दंगलमध्ये ‘देवाभाऊ केसरी’ किताब पटकावला.
राष्ट्रीय कुस्तीपटू सोनाली मंडलिक हिने परदेशी प्रतिस्पर्ध्यांवर मात केल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष अभिनंदन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोनाली मंडलिक हिला ‘देवाभाऊ केसरी’ किताबासह मानाची चांदीची गदा व रोख पारितोषिक देण्यात आले.
सोनाली मंडलिक हिच्या यशाबद्दल महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्रतात्या फाळके, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य आमदार रोहितदादा पवार, अंबादासजी पिसाळ, बप्पाजी धांडे, राजेंद्र निंबाळकर, दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. संतोष भुजबळ तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक यांनी अभिनंदन केले