दादा पाटील महाविद्यालयात ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा

कर्जत (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र राज्याची राजभाषा असलेल्या मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त व्हावा आणि मराठी भाषेचे संवर्धन व्हावे या हेतूने दरवर्षी ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ दिनांक १४ जानेवारी ते दिनांक २८ जानेवारी या कालावधीमध्ये साजरा करण्यात येतो. त्यानुसार यावर्षी देखील दादा पाटील महाविद्यालयामध्ये मराठी भाषेसंदर्भातील विविध कार्यक्रम मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यामध्ये आयोजित करण्यात आले होते.
शनिवार दिनांक २० जानेवारी २०२४ रोजी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी काव्यवाचन व हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अनेक विद्यार्थ्यांनी स्वरचित कवितांचे सादरीकरण केले.
दादा पाटील महाविद्यालयाचा मराठी विभाग व महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक २५ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १० ते १२ या कालावधीमध्ये ‘माझी साहित्यिक जडणघडण’ या विषयावरील ‘वार्तालाप’ कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयामध्ये करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी सत्रसंवादक म्हणून कर्जत येथील कवयित्री स्वाती पाटील, उल्का केदारे, गझलकार शिवाजी काळे यांना निमंत्रित करण्यात आले होते. मराठी विभागातील विद्यार्थी ऋषिकेश पाचपुते, विशाल विटेकर, आशुतोष चव्हाण, पुनम मोढळे, तृप्ती काळे, पूनम गवळी, विक्रम परदेशी, भारती गोडसे, बिपाशा कटारे, प्राजक्ता खाडे, साक्षी कानगुडे, तृप्ती कवितके, निकिता साळुंके आदि विद्यार्थ्यांनी या ‘वार्तालाप’ कार्यक्रमामध्ये सूत्रसंवादक म्हणून भूमिका निभावून निमंत्रित कवयित्री, गझलकरांकडून प्रश्नोत्तराच्या माध्यमातून त्यांची साहित्यिक जडणघडण उपस्थितांसमोर उलगडून दाखवण्याची किमया पार पाडली.
यानिमित्ताने गझलकार शिवाजी काळे यांनी ‘अकरावी दिशा’ या प्रकाशित गझल संग्रहातील काही रचना उपस्थितांसमोर मांडल्या. कवयित्री स्वाती पाटील यांनी ‘स्पंदन व उसवत्या सांजवेळी’ या त्यांच्या प्रकाशित कवितासंग्रहातील काही कविता सादर करून कवितेच्या निर्मिती प्रक्रियेविषयीची भूमिका विशद केली. ‘कुंकवाचा करंडा’ काव्यसंग्रह व ‘माझीया मना’ ललितसंग्रहाच्या लेखिका उल्का केदारे यांनी लेखिका म्हणून स्वतःची झालेली जडणघडण उपस्थितांसमोर मांडून नवोदित लेखन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या वार्तालापाच्या अध्यक्षीय मनोगतामध्ये प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी सांगितले की, महाविद्यालयामध्ये आयोजित होत असलेल्या साहित्यिक उपक्रमांचा लाभ घेऊन उत्तमोत्तम साहित्य विद्यार्थ्यांकडून लिहिले जावे अशी अपेक्षा व्यक्त केली. महाविद्यालयामध्ये प्रकाशित होणाऱ्या भित्तिपत्रिका व कर्मज्योती वार्षिक नियतकालिकाकरिता दर्जेदार साहित्य विद्यार्थ्यांकडून मिळत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
माझी साहित्यिक जडणघडण या विषयावरील वार्तालापाचे प्रास्ताविक मराठी विभागातील प्रा. सुखदेव कोल्हे यांनी केले. आभार डॉ. भारती काळे यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा. सीमा डोके यांनी केले. प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली दादा पाटील महाविद्यालयामध्ये ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ यशस्वीरित्या संपन्न झाला.