कैकाडी महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याबाबत; मुख्यमंत्री व सभापतींकडे निवेदनाद्वारे मागणी.


राशीन (प्रतिनिधी – जावेद काझी):
महाराष्ट्र राज्यातील आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या अत्यंत मागासलेल्या कैकाडी समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी ‘महान तपस्वी राष्ट्रसंत कैकाडी महाराज आर्थिक विकास महामंडळ’ स्थापन करण्यात यावे, अशी आग्रही मागणी भारतीय जनता पार्टी भटक्या विमुक्त आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष तात्यासाहेब माने यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस आणि विधान परिषदेचे सभापती मा. ना. राम शिंदे यांची समक्ष भेट घेऊन त्यांना सविस्तर मागणीचे निवेदन सादर केले.

निवेदनात तात्यासाहेब माने यांनी म्हटले आहे की, अलीकडच्या काळात महाराष्ट्र शासनाने राज्यातील विविध समाजांसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळांची स्थापना केली आहे. मात्र, यामध्ये कैकाडी समाजाचा उल्लेख राहून गेला आहे. कैकाडी समाज हा विमुक्त जाती समूहातील खऱ्या अर्थाने वंचित आणि उपेक्षित समाज आहे. ब्रिटिश काळापासून या समाजावर लागलेला गुन्हेगारी जातीचा शिक्का आणि स्वातंत्र्यानंतरची कित्येक दशके उलटूनही हा समाज प्रगतीपासून आणि मुख्य प्रवाहापासून फार दूर राहिला आहे.

आजच्या प्रगत अर्थव्यवस्थेच्या युगातही कैकाडी समाजातील बांधव मोठ्या प्रमाणावर गावकुसाबाहेर पाल ठोकून, गावोगावी भटकंती करत दारिद्र्याचे आणि अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहेत. समाजात शिक्षणाचे प्रमाण अत्यंत कमी असून, शासकीय नोकऱ्या किंवा उद्योगधंद्यांमध्ये तरुणांचे रोजगाराचे प्रमाण नगण्य आहे. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि आर्थिकदृष्ट्या हा समाज प्रचंड मागासलेला आहे.

“कैकाडी समाजातील युवकांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी आणि त्यांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वतंत्र महामंडळाची अत्यंत गरज आहे. विद्यमान सरकारच्या काळात ‘महान तपस्वी राष्ट्रसंत कैकाडी महाराज आर्थिक विकास महामंडळ’ स्थापन झाल्यास, या वंचित आणि भटक्या समाजाच्या आयुष्यात निश्चितच सर्वांगीण विकासाची पहाट उजडेल,” असा विश्वास तात्यासाहेब माने यांनी निवेदनातून व्यक्त केला आहे.
या निवेदनाची दखल घेऊन सरकार कैकाडी समाजाला न्याय देईल, अशी अपेक्षा संपूर्ण समाजाकडून व्यक्त केली जात आहे.



