कर्जत-जामखेड मतदारसंघातील २७ रस्त्यांच्या कामांसाठी ५१ कोटींचा भरघोस निधी मंजुर !
मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा -३ : आमदार प्रा. राम शिंदे यांच्या पाठपुराव्याला मिळाले यश

कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत-जामखेड : महायुती सरकारने नवरात्रोत्सवाची कर्जत जामखेडकरांसाठी मोठी भेट दिली आहे.ग्रामविकास विभागाने मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा – ३ अंतर्गत २७ रस्त्यांच्या कामांसाठी ५१ कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर केला आहे. आमदार प्रा. राम शिंदे यांच्या अथक प्रयत्नांमुळे या निधीस मंजुरी मिळाल्याने कर्जत-जामखेड मतदारसंघातील जनतेमध्ये आनंद आणि समाधानाचे वातावरण आहे.
विधानपरिषदेचे आमदार झाल्यापासून आमदार राम शिंदे यांनी कर्जत जामखेड मतदारसंघातील रस्त्यांच्या कामांसह इतर अनेक कामांसाठी आजवर करोडो रूपयांचा निधी खेचून आणला आहे. आता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून त्यांनी ५१ कोटी रूपयांचा निधी खेचून आणण्यात यश मिळवले आहे. मतदारसंघात रस्त्यांचे मजबुत जाळे निर्माण करण्याकरिता नेहमी सतर्क असल्याचेच आमदार शिंदे यांनी यातून पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.
आमदार प्रा. राम शिंदे यांनी सदरचा निधी प्राप्त व्हावा याकरिता घेतलेली मेहनत व केलेल्या जोरदार पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजना – टप्पा ३ या योजनेतून २७ रस्त्यांची कामे मंजुर झाली आहेत. यामध्ये कर्जत तालुक्यातील १८ व जामखेड तालुक्यातील ०९ रस्त्यांचा समावेश आहे. हे २७ रस्ते विविध गावांना जोडणारे आहेत. कर्जत-जामखेड मतदारसंघातील २७ रस्त्यांच्या विकासासाठी मंजूर करण्यात आलेला ५१ कोटी रुपयांचा निधी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. आमदार प्रा. राम शिंदे यांच्या अथक प्रयत्नांमुळे या योजनेला गती मिळाली आहे. यामुळे जनतेत आनंदाचे वातावरण आहे.