दुभंगलेल्या समाजास एकत्र येण्यासाठी प्रत्येक गावात सर्व सामाजिक संघटना स्थापन झाल्या पाहिजेत ; डॉ अविनाश पोळ

समृद्ध कर्जत (प्रतिनिधी) :- श्रमदानाचे कार्य ईश्वरी काम आहे. याची किंमत कोणीच करू शकत नाही. कारण हे काम करण्यासाठी ध्येयवेडाच माणूस लागतो. आणि अशी माणसे समाजात आणि सभोवताली फार कमी मिळतात. मनुष्य हा परिवर्तनशील आहे. जे येतील त्यांना सोबतीला घ्या. जे येणार नाही त्यांचा द्वेष करू नका. त्याचा आदर करा. त्याना स्नेह द्या. निश्चित त्याच्यात बदल घडतो असे प्रतिपादन पाणी फाऊंडेशनचे प्रमुख मार्गदर्शक डॉ अविनाश पोळ यांनी केले.
दरम्यान ते शारदाबाई पवार सभागृहात सर्व सामाजिक संघटनेच्या चतुर्थ वर्षपूर्ती सन्मान सोहळ्याप्रसंगी बोलत होते. यावेळी येसूबाई फेम सिने अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, बारामती ऍग्रोचे सुनंदा पवार, वन परीक्षेत्र अधिकारी मोहन शेळके, करमाळा पोलीस निरीक्षक विनोद घुगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता प्रशांत वाकचौरे, दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय नगरकर आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना डॉ पोळ म्हणाले की, जगातला एकमेव नेता असा आहे ज्याने शस्त्र हाती न घेता लढाई लढला ते महात्मा गांधी होय. माणसाने काम करीत असताना आपला आतील आवाज ऐकावा. आतील आवाज हा परमात्माचा असतो. आणि तोच इतिहास घडवतो. दुभंगलेल्या समाजास एकत्र येण्यासाठी प्रत्येक गावात सर्व सामाजिक संघटना स्थापन झाल्या पाहिजेत. या संघटनेच्या कार्याची महती त्यांच्या पर्यावरण कार्याने सर्वत्र मिळत आहे. प्रत्येकाने आपल्या जीवनात आनंदाची वाट शोधायला हवी. आणि ही आनंदाची वाट लहान-लहान कार्यातच मिळते. सिने अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड म्हणाल्या की, पर्यावरणात काम करणारे लोक खरेच सर्व समाजासाठी आदर्श आहे. सर्व सामाजिक संघटनेचे वृक्षसंवर्धन कार्य कर्जतला येताच स्वच्छ, सुंदर हरीत दिसल्यास जाणवते. ते इतर शहर आणि गावांनी अंगीकारले पाहिजे. पर्यावरण वाचले तर आपण
वाचू याचे भान आवश्यक आहे. बारामती ऍग्रोच्या विश्वस्त सुनंदा पवार म्हणाल्या की, पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असून यासाठी प्रत्येक गावाने, व्यक्तीने पुढे आले पाहिजे.
निसर्गाच्या ऋणातून मुक्त व्हायचे असेल तर त्यांचे संवर्धन करावे. जल, पशु, पक्षी, प्राणी, वन संकट सध्या घोंगावत आहे. यास अटकाव होणे आवश्यक आहे. सर्व सामाजिक संघटनेचे कार्य निश्चित सर्वांना मार्गदर्शक आहे. त्यांचा सन्मान करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यांनी इतर लोकांचा सन्मान केला. तो देखील वाखाण्याजोगा आहे. प्राचार्य डॉ संजय नगरकर म्हणाले की, सर्व सामाजिक संघटनेने कर्जतची दुष्काळी परिस्थिती हरीत करण्याचे ध्येय हाती घेतले होते. ती अनेक भागात पूर्ण झाले आहे. शहरातील अनेक परिसराचे भाग्य या श्रमप्रेमीनी उजळले याचा कर्जतकरांना अभिमान आहे. याप्रसंगी मिरजगाव, राशीन, करकंब, बार्शी, चांदे, सिद्धटेक, करपडी, म्हालंगी, शिंदे, रवळगाव, दूरगाव, थेरगाव, दिघी, अळसुंदे, वनविभाग कर्जत, करमाळा पोलीस विभाग, कर्जत-जामखेड एकात्मिक संस्था, स्वाभिमानी यात्रेतील सेवेकरी, भोसे, एनसीसी विभाग मेजर डॉ संजय चौधरी व छात्रसैनिक, एनएसएस, एनसीसी महात्मा गांधी, कै दिलीपनाना आणि भास्कर तोरडमल क्रीडा संकुल, टायगर अकादमी, पत्रकार संघ यासह या सामाजिक कार्यास आर्थिक सहाय्य आणि वृक्षसंवर्धनात काम करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.