कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेचे टँकर राजकीय दबावाने शासनाने बंद केल्यामुळे महिलांचा तहसील कार्यालयावर मोर्चा

समृध्द कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत तालुक्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून नागरिकांना घरोघरी टँकरने मोफत पाणीपुरवठा करण्यात येत होता.कर्जत-जामखेड तालुक्यातील ५० पेक्षा अधिक गावांमध्ये सद्य स्थितीला भीषण परिस्थिती निर्माण झालेली असताना देखील निवडणुकीच्या कामात व्यस्त असणाऱ्या प्रशासनाला या गंभीर परिस्थितीचा विसर पडलेला दिसत आहे.
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चाललेला असताना प्रशासन मात्र सुस्त दिसत आहे. मागील एका महिन्यापासूनच या गावांमध्ये पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. परंतु शासन दरबारी सदर गावे दुष्काळाच्या निकषात बसत नसल्याने ही गावे तहानलेलीच आहेत.मात्र आमदार रोहित पवार यांनी पुढाकार घेऊन कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून ५० पेक्षा जास्त गावातील नागरिकांना घरोघरी टँकरने मोफत पाणीपुरवठा करण्यात येत होता. यामुळे नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भागत होता. परंतु काही कायदेशीर आणि तांत्रिक बाबींचे कारण सांगत प्रशासनाकडून सध्या हे टँकर बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांचे पाण्यावाचून मोठे हाल होत असून विशेषतः महिला वर्गाला पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पिण्याच्या आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
दुसरीकडं अद्यापही शासकीय टँकर सुरू झालेले नाहीत. मागील पाच वर्षांपासून कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेमार्फत लोकांच्या मागणीनुसार पाणीपुरवठा केला गेला. परंतु सध्या प्रशासनाकडून हे टँकर बंद करण्यात आल्याने लोकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. टँकर पुन्हा सुरु न झाल्यास लोकांमधील संतापाची तीव्रता अधिक वाढून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा धोका आहे. त्यामुळे शासनास सहाय्यभूत ठरणाऱ्या ‘कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थे’च्या माध्यमातून टँकरद्वारे केला जाणारा पाणीपुरवठा पुन्हा सुरू करण्यात येवा आणि शासकीय टँकर ही सुरु करुन लोकांच्या मागणीप्रमाणे पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे. या गावातील नागरिकांमध्ये प्रचंड रोष दिसून येत आहे. स्वतः ही करायचा नाही आणि दुसरा करतोय त्यालाही आडकाठी’ अशा प्रकारच्या आडमुठेपणाच्या धोरणामुळे नाराज झालेल्या महिला भगिनींनी येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देत कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेचे टँकर पूर्वत चालू करण्याबाबतचे निवेदन तहसीलदार गुरु बिराजदार यांना दिले.