कर्जत तहसील कार्यालय परिसर दुर्लक्षित; स्वच्छतेचा अभाव आणि विद्युत रोहित्राचा धोका

कर्जत : – कर्जत तहसील कार्यालय परिसरात अस्वच्छतेने गंभीर स्वरूप धारण केले असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. परिसरात मोठ्या प्रमाणावर गवत, झुडुपे, कचऱ्याचे ढिगारे आणि जळालेल्या पानगळीचा अंबार जमा झाला आहे. ही परिस्थिती सरकारी कार्यालयाच्या शिस्त आणि स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.
विशेष म्हणजे, परिसरात या ठिकाणी मोठी गवतझुडपे वाढल्यामुळे वीज वाहिन्यांच्या संपर्कात येण्याचा धोका निर्माण झाला आहे. विद्युत रोहित्र मुळे स्पारर्कींग होऊन जवळ झालेल्या अस्वच्छतेमुळे आग लागण्याची किंवा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दररोज तहसील कार्यालयात अनेक नागरिक ये-जा करत असतात. मात्र, परिसरातील अस्वच्छता आणि सुरक्षा व्यवस्थेकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. विशेषतः वीज वितरण कंपनीकडून कार्यालय परिसरातील डीपीभोवती योग्य सुरक्षा व्यवस्था न केल्याने अपघातांचा धोका निर्माण होऊ शकतो. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून परिसराची स्वच्छता राखण्यासोबतच डीपीभोवती आवश्यक सुरक्षा व्यवस्था करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.