सातत्यपूर्ण वाचन उपक्रमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पाईक होऊयात…पोलीस उपअधिक्षक अण्णासाहेब जाधव

कर्जत (प्रतिनिधी) :- दादा पाटील महाविद्यालयामध्ये ‘दि.११ एप्रिल ते १४ एप्रिल २०२३’ या कालावधीत महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सप्ताहनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
शुक्रवार दिनांक १४ एप्रिल २०२३ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वाड्मय मंडळ आयोजित महाविद्यालयात ‘१४ तास अखंड वाचन’ उपक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये केले होते.
या उपक्रमामध्ये पोलीस उपअधिक्षक कर्जतचे श्री. अण्णासाहेब जाधव हे आवर्जून सहभागी झाले. आपल्या कार्य बाहुल्यामुळे त्यांना पूर्णवेळ थांबता आले नाही, तरीदेखील अवकाळी पावसामुळे निर्माण झालेला कर्जतमधील विजेचा लपंडाव आणि दमट वातावरण असतानाही जाधवसाहेब दुपारच्या काळात सलगपणे तीन तास ‘वाचन उपक्रमामध्ये’ सहभागी झाले. या कालावधीत त्यांनी एका ग्रंथाचे वाचनही केले. त्यांच्या व्यस्त कामांमधूनही त्यांनी कॉलेज उपक्रमांमध्ये घेतलेला सहभाग विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व उत्साहवर्धक ठरला.
या प्रसंगी जाधव साहेबांनी ‘१४ तास अखंड वाचन’ उपक्रमांमध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कॉलेजच्या उपक्रमांमध्ये मिसळल्यामुळे मला नवी ऊर्जा असल्याचे नमूद केले. शिवाय या उपक्रमात सहभागी असताना विद्यार्थीदशेत असल्याचा आनंदही मिळाला. पूर्वी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना अभ्यासाची बैठक ठेवावी लागायची. अवांतर व वेगवेगळ्या विषयांशी संबंधित वाचन विद्यार्थ्यांना नवी दिशा देते. १४ एप्रिलच्या दिवशी अनेक ठिकाणी १४ तेे १८ तास वाचनाचे उपक्रम राबविले जातात. सर्व विद्यार्थ्यांनी डॉ.आंबेडकरांचा आदर्श घेऊन सातत्यपूर्ण वाचनातून त्यांचे पाईक होऊयात, असा मौलिक संदेश आपल्या मनोगतातून दिला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी पोलीस उपअधिक्षक कर्जतचे श्री. अण्णासाहेब जाधव यांचे ‘१४ तास अखंड वाचन’ उपक्रमात सहभागी झाल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करून धन्यवाद व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे आयोजन वाडमय मंडळामार्फत करण्यात आले होते. या उपक्रमामध्ये महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर सेवक वर्ग सहभागी झाला.