खोटा गुन्हा रद्द करण्यासाठी नगरपंचायत कर्मचाऱ्यांचे पोलीस निरीक्षकांना निवेदन

कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत नगरपंचायतीचे नगरसेवक नामदेव चंद्रकांत राऊत यांच्यावर नगरपंचायतच्या लेखापाल नयना कुंभार यांनी शासकिय कामात अडथळा, विनयभंग व इतर कलमाद्वारे गुन्हा दाखल केलेला आहे. यातील आरोप व गुन्हे खोटे असून ते रद्द करावेत या मागणीसाठी नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी कर्जतच्या पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले आहे. कर्मचाऱ्यांनी या घटनेचा निषेध केला आहे.
निवेदनात म्हटले आहे, ३१ जानेवारी रोजी नगरपंचायत कार्यालयामध्ये माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक नामदेव चंद्रकांत राऊत यांच्यावर नगरपंचायतच्या कर्मचारी लेखापाल नयना कुंभार यांनी शासकिय कामात अडथळा व इतर काही खोटे आरोप व गुन्हे नोंदविलेले आहेत. ते पुर्णपणे चुकीचे असून याप्रसंगी आम्ही काही कर्मचारी नगरपंचायत कार्यालयात उपस्थित होतो. नामदेव राऊत हे नगरपंचायतीचे नगरसेवक असल्याने त्यांनी लेखापाल नयना कुंभार यांना कर्जत नगरपंचायतीचे बँक खाते आयकर विभागाने सील केलेल्या खात्याबाबत चर्चा करत असताना त्यामध्ये शाब्दिक बोलणे झाले. यामधून शासकिय कामकाजात अडथळा होण्यासारखा प्रकार घडलेला नसून तसेच विनयभंग व इतर काही चुकीचे कलम लावणे अयोग्य आहे.
नयना कुंभार यांनी केलेले आरोप हे जर खरे असते तर आम्ही सर्व कर्मचारी त्यांच्या बाजूने उभे राहिलो असतो परंतू हे सर्व आरोप खोटे असल्यामुळे आम्ही सर्व कर्मचारी नयना कुंभार यांच्या कृत्याचा जाहीर निषेध व्यक्त करत आहोत. नयना कुंभार यांनी हे आरोप आकस व द्वेषापोटी केलेले आहेत. नामदेव चंद्रकांत राऊत यांच्यावर केलेल्या खोटया तक्रारी व खोटे गुन्हे रदद करण्यात यावेत अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. ही निवेदने जिल्हाधिकारी, सहआयुक्त नगरपालिका शाखा, उपविभागीय पोलीस अधिकारी, मुख्याधिकारी यांना देण्यात आली आहेत.
निवेदनावर रवींद्र साठे, राकेश गदादे, संतोष समुद्र, अशोक मोहोळकर, ए. एम. जिने, एस. आर. राऊत, बुवासाहेब कदम, आर. एस. नेवसे, सुरेश धुमाळ, सचिन पवार, कुंडलिक पवार, किशोर भैलुमे, ए. एस कदम व इतर कर्मचाऱ्यांसह २४ सफाई कामगारांचा सह्या आहेत