कर्जत पोलिसांची मोठी कारवाई ; बोगस डॉक्टर विरुद्ध गुन्हा दाखल

समृद्ध कर्जत / (प्रतिनिधी) :- कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी येथे वैद्यकीय पथकाने बोगस डॉक्टरवर कारवाई केली आहे. कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना वैद्यकीय व्यवसाय करताना डॉक्टर आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. कर्जत पंचायत समितीचे आरोग्य विस्तार अधिकारी व शासकीय बोगस वैद्यकीय व्यवसायिक शोध समितीचे सदस्य मारुती मच्छिंद्र जाधव यांनी त्याच्याविरुद्ध कर्जत पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, कर्जतचे गटविकास अधिकारी यांना गुरुवारी, (दि. ८) सकाळी पिंपळवाडी येथे रोबीन सौराद बिश्वास हा कुठलीही पदवी, शिक्षण नसताना बोगस वैद्यकीय व्यवसाय करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार बोगस डॉक्टर शोध समीतीचे अध्यक्ष तथा गटविकास अधिकारी प्रदिप शेंडगे, पंच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप व्हरकटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष शिंदे यांनी शासकिय वाहनाने पिंपळवाडी येथे जावून खात्री केली असता त्यांना सय्यद भाई शेख यांच्या राहत्या घराच्या शेजारी एका पत्र्याच्या खोलीमध्ये एक टेबल, समोर दोन खुर्च्छा, दोन कॉट ठेवलेले व टेबलजवळील खुर्चीवर एक इसम बसलेला दिसला. त्यावेळी पथकाने त्यांची ओळख करुन देत त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी रोबीन सौराद बिश्वास, वय : ५४ वर्षे, रा. सलुधारी, कच्चा रस्ता, पोष्ट मामाभाणगे, ता. बागदा, जि. नॉर्थ २४ परगणा हल्ली रा. पिंपळवाडी असे सांगितले.
त्याने २००८ सालापासुन वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचे सांगितले. पथकाने त्यास वैद्यकीय व्यवसाय करण्याचे प्रमाणपत्र व डीग्रीची मागणी केली असता त्याने माझ्याकडे आता वैद्यकिय व्यवसायाचे कोणतेही प्रमाणपत्र व डीग्री नाही असे सांगितले. पथकाने खोलीची पंचासमक्ष पाहणी केली असता त्या खोलीमध्ये विविध प्रकारचे अॅलोपॅथीक औषधे, इंजेक्शन्स व सलाईन आढळून आले. वैद्यकिय व्यवसायिक नसताना वैद्यकिय व्यवसायिक असल्याचे भासवून रुग्णावर उपचार केले व दवाखाना चालवण्याची परवाणगी नसताना दवाखाना चालविताना तो आढळून आला तसेच अॅलोपॅथीक संबंधीची औषधे देण्याची परवाणगी नसताना औषधे दवाखान्यात बाळगल्याने तेथील औषधसाठा पंचनामा करून जप्त केला व बोगस डॉक्टर यास ताब्यात घेवून पोलीस स्टेशनला नेण्यात आले.
त्याच्याविरुद्ध कलम ४१९, ४२० तसेच महाराष्ट्र मेडीकल प्रॅक्टीशन अॅक्ट १९६१ चे कलम ३३, ३३ (अ), ३६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
कर्जत तालुक्यातील बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी युवक क्रांती दल, कर्जत तालुका यांच्या वतीने तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप व्हरकटे यांच्याकडे ५ ऑक्टोबर २०२३ रोजी निवेदन देवून केली होती. कर्जत तालुक्यातील कोणकोणत्या गावांमध्ये बोगस डॉक्टर कार्यरत आहेत याबाबतची माहिती त्यांना कार्यकर्त्यांनी दिली होती. मात्र त्यानंतर ४ महिने उलटूनही त्यांनी कारवाई केली नव्हती. अखेर समितीच्या अध्यक्षांनी पुढाकार घेऊन ही कारवाई केली. त्याचे युवक क्रांती दलाच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे.