
कर्जत (प्रतिनिधी) :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष ॲड. बाळासाहेब शिंदे युवक तालुकाध्यक्ष संतोष ऊर्फ पप्पू धुमाळ यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाच्या पुढील ध्येयधोरणाबाबत माहिती दिली.
ते म्हणाले, अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत ही जनतेची इच्छा आहे. त्यामुळे अजितदादा मुख्यमंत्री झाले पाहिजे. कर्जत – जामखेड मतदारसंघात आमच्या विचाराचा आमदार व्हावा यासाठी प्रयत्न करणार आहोत. तालुक्यातील गावागावात पक्ष पोहचविण्याचे काम केले जाणार आहे. लवकरच नवीन कार्यकारिणी करुन सर्व गावांमधून सर्व समाजाच्या लोकांना प्रतिनिधित्व मिळावे यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. राष्ट्रवादी पक्षाचा आमदार असल्याने हक्क सांगितला जाईल.
कर्जत तालुक्यातील रस्त्याच्या कामासाठी ४५ कोटींचा निधी दिला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने जास्तीत जास्त जागा मागून त्या निवडून आणल्या जाणार आहेत. अंबालिका कारखान्याच्या माध्यमातून परिसरात विकास केला आहे. यापुढेही विकासकामे सुरूच ठेवली जाणार आहेत. पक्षाचे संघटन वाढविण्यावर भर दिला जाणार असून नविन लोकांना पक्षात सामील करून घेतले जाणार आहे. जबाबदारी सोपवण्यात येईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची वाटचाल करून मतदारसंघात पक्षाचा पाया मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे.