दादा पाटील महाविद्यालय, कर्जत येथे दुसऱ्या स्रीशिक्षिका साहित्य संमेलनाचे आयोजन

कर्जत (प्रतिनिधी) :- केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर, संपूर्ण भारतातील महिला शिक्षकांच्या आद्यकर्त्या, शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाचे महत्त्व ओळखून आणि उपेक्षित बहुजनांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी अपार कष्ट घेतलेल्या, भारतातील स्त्रियांच्या जीवनात नवपरिवर्तन करणाऱ्या, स्री हक्काच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त दादा पाटील महाविद्यालय, कर्जत जि. अहमदनगर येथे दुसऱ्या स्रीशिक्षिका साहित्य संमेलनाचे आयोजन बुधवार दि. ३ जानेवारी २०२४ रोजी महाविद्यालयाच्या शारदाबाई पवार सभागृहात करण्यात आले आहे.
सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना उजाळा मिळावा आणि स्री सक्षमीकरणाचा जागर व्हावा या उद्देशाने सदर साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनात अहमदनगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षिका साहित्यिक सहभागी होणार आहेत. साहित्यिक स्रीशिक्षिकांना सशक्त विचारपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच महिलांचे अर्थविश्व व नव तंत्रज्ञानाच्या जाणीवा समृद्ध करण्यासाठी आणि मराठी साहित्य विश्वाकडून स्रीशिक्षिकांच्या असलेल्या अपेक्षांची जाणीव करून देण्यासाठी हे एकदिवसीय साहित्य संमेलन आयोजित केले आहे.
संमेलनाच्या उद्घाटक म्हणून ज्येष्ठ लेखिका माननीय शैलजा ज्ञानेश्वर मोळक, ह्या उपस्थित असणार आहेत. या साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून छाया कोरेगावकर, कोरेगाव-सातारा यांची निवड करण्यात आली आहे. प्रमुख पाहुणे म्हणून सौ. सुनंदा राजेंद्र पवार, विश्वस्त, ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. प्रतिभा अहिरे, प्रमुख अतिथीमध्ये अशोक कडूस, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), अहमदनगर, डॉ. केशव तुपे, विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण, पुणे विभाग आणि प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के, सहसचिव, रयत शिक्षण संस्था सातारा, श्रीमती उज्ज्वला गायकवाड, गट शिक्षण अधिकारी कर्जत तसेच महाविद्यालय विकास समितीचे सर्व सदस्य, माजी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
माननीय राजेंद्रतात्या फाळके, सदस्य, जनरल बॉडी, रयत शिक्षण संस्था सातारा व अध्यक्ष, महाविद्यालय विकास समिती हे या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष तर कर्जत-जामखेडचे लोकप्रिय आमदार व सदस्य, जनरल बॉडी, रयत शिक्षण संस्था सातारा, माननीय रोहितदादा पवार हे या संपूर्ण साहित्य संमेलनाचे निमंत्रक आहेत.
एकदिवसीय स्रीशिक्षिका साहित्य संमेलनात सकाळच्या सत्रात ८.०० वाजता कर्जत शहरातून ग्रंथ दिंडी व शोभायात्रा निघणार असून त्यात महात्मा गांधी विद्यालय, सौ.सो.ना.सोनमाळी कन्या विद्या मंदिर व दादा पाटील महाविद्यालयातील विद्यार्थिनी व शिक्षक सहभागी होतील. त्यानंतर उद्घाटन सत्र व साहित्यिक, समाजिक व शैक्षणिक कार्य करणाऱ्या स्रीशिक्षिकांचा पुरस्कार वितरण समारंभ होईल. पहिल्या सत्रात ‘सत्यशोधक’ चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक निलेश रावसाहेब जळमकर व निर्माता, सहनिर्माता यांच्या उपस्थितीमध्ये ‘सत्यशोधक चित्रपट विमोचन’ होईल. माननीय शुभांगीताई पाटील, टीचर्स असोसिएशन राज्याध्यक्षा यांच्या अध्यक्षतेखाली दुसऱ्या सत्रात ‘मी व माझे साहित्य’ या विषयावर ‘वार्तालाप’ हे सत्र होईल. यामध्ये प्राचार्या सौ. मंगल श्रीधर पाटील, सातारा, विमलताई माळी, सोलापूर, धम्मसंगिनी रमागोरख, नागपूर हे सहभागी होणार आहेत.
माननीय कविता मोरवणकर यांच्या अध्यक्षतेखाली व सूत्रसंवादिका स्वाती पाटील यांच्या उपस्थितीत तिसऱ्या सत्रात ‘बाईपणाच्या कविता’ या विषयावर कवयित्री संमेलन होणार आहे. कवयित्री संमेलनामध्ये अर्चना चव्हाण (परळी), सुनिता कोमवार (परळी), शिवकन्या साळुंके (अंबाजोगाई), अलका सुरनर (परळी), रचना (पाथर्डी), उज्ज्वला रनेर (पाथरी), सुलक्षणा सरवदे (लातूर), भक्ती पाटील (दहिवडी), मनीषा पाटील (सांगली), आशा डांगे, निशा कापडे (छ.संभाजीनगर), सिंधुताई दहिफळे (हिंगोली), जयश्री बागुल (नाशिक), उज्ज्वला जाधव (कर्जत), प्रतिभा खैरनार (नांदगाव-नाशिक), वैशाली उगले (कर्जत), मनीषा सातपुते (कर्जत), वंदना घोडके (अहमदनगर), जयश्री सोनार (कर्जत), सारिका खराडे (कर्जत), उल्का केदारे (कर्जत), शारदा टेंबे (करमाळा), सुवर्णा पवार (कर्जत), कल्पना जाधव (करमाळा), माया काळदाते (कर्जत), शुभांगी सोनवणे (कर्जत), प्राजक्ता शिंदे (करमाळा), अर्चना पवार (सातारा), साक्षी गांगर्डे (कर्जत), शुभदा लोंढे (पुणे), आदि कवयित्री सहभागी होणार आहेत. समारोपीय सत्राने या संमेलनाची सांगता होईल.
या साहित्य संमेलनामध्ये प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शाखेमध्ये शिक्षिका म्हणून काम करणाऱ्या व सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्यविषयक योगदान देणाऱ्या शिक्षिकांना राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, ताराबाई शिंदे, रखमाबाई राऊत, मुक्ता साळवे, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील, दुर्गा भागवत, नजूबाई गावित, गेल ऑम्वेट, बाया कर्वे, भूमिकन्या आदिंच्या नावे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
संमेलनामध्ये सहभागी झालेल्या सर्व स्रीशिक्षिकांना चहा, अल्पोपहार, भोजन, माहिती किट व सहभाग प्रमाणपत्र नि:शुल्क पुरविले जाईल. या संमेलनामध्ये महाराष्ट्रातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शाखेतील जास्तीत जास्त स्री-शिक्षिकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन दादा पाटील महाविद्यालय, कर्जतचे प्राचार्य व डॉ. संजय नगरकर यांनी केले आहे.