दादा पाटील महाविद्यालय, कर्जत येथील दुसऱ्या स्रीशिक्षिका साहित्य संमेलनातील विविध पुरस्कारांची घोषणा

कर्जत (प्रतिनिधी) :- रयत शिक्षण संस्थेचे दादा पाटील महाविद्यालय कर्जत जि. अहमदनगर येथील मराठी विभागाच्या वतीने भारतातील स्त्रियांच्या जीवनात नवपरिवर्तन करणाऱ्या, स्रीहक्काच्या प्रणेत्या, भारतातील पहिल्या स्रीशिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त दादा पाटील महाविद्यालय, कर्जत जि. अहमदनगर येथील शारदाबाई पवार सभागृहात दुसरे स्रीशिक्षिका साहित्य संमेलनाचे आयोजन बुधवार दि. ३ जानेवारी २०२४ रोजी करण्यात आले आहे.
या संमेलनाचे उद्घाटन शिवस्फूर्ती प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा ॲड. शैलजा ज्ञानेश्वर मोळक यांच्या हस्ते होणार आहे. उदघाटन सत्रातच संमेलनाचे उदघाटक ॲड. शैलजा ज्ञानेश्वर मोळक, निमंत्रक आमदार रोहितदादा पवार, स्वागताध्यक्ष राजेंद्रतात्या फाळके, प्रमुख पाहुण्या सौ. सुनंदाताई राजेंद्र पवार, संमेलनाध्यक्षा छाया कोरेगावकर, माजी संमेलनाध्यक्षा डॉ. प्रतिभा अहिरे, संयोजक प्राचार्य डॉ. संजय नगरकर आदि मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे चालविणाऱ्या स्त्रीशिक्षिकांना व वैचारिक प्रबोधन करणाऱ्यांना स्रीसुधारकांच्या नावे वेगवेगळे पुरस्कार संमेलनाच्या उदघाटन सत्रात वितरित केले जाणार आहेत.
सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्यविषयक योगदान देणाऱ्या पुरस्कारर्थींमध्ये सौ. मीनल मोहनीराज वसमतकर (कामोठे-नवी मुंबई) यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार, आशा अशोक डांगे (छ. संभाजीनगर) यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार, सौ. विमलताई माळी (आनगर-मोहोळ) यांना सावित्रीबाई फुले पुरस्कार, नासीम शेख ( अहमदनगर) यांना फातेमा शेख पुरस्कार, प्रा. सुलक्षणा सोनवणे-सरवदे (लातूर) यांना ताराबाई शिंदे पुरस्कार,प्राचार्य सौ. मंगल श्रीधर पाटील (सातारा) यांना लक्ष्मीबाई भाऊराव पाटील पुरस्कार, डॉ. प्रेमा लेकुरवाळे-चोपडे (नागपूर) यांना रखमाबाई राऊत पुरस्कार, ॲड. डॉ. सुचित्रा घोगरे-काटकर (सातारा) यांना मुक्ता साळवे पुरस्कार, रचना (पाथर्डी) यांना दुर्गा भागवत पुरस्कार, प्रा. जयश्री बागूल-खरे (सिन्नर-नाशिक) यांना नजूबाई गावित पुरस्कार, धम्मसंगिनी रमागोरख (नागपूर) यांना गेल ऑम्वेट पुरस्कार, डॉ. प्राची जोशी (गोवा) यांना बाया कर्वे पुरस्कार, सौ.सारिका खराडे (कर्जत) यांना भूमिकन्या पुरस्कार अशा एकूण तेरा पुरस्कारांची घोषणा, दुसरे स्रीशिक्षिका साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष मा. राजेंद्र (तात्या) फाळके, निमंत्रक आमदार मा. रोहितदादा पवार, संयोजक प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांच्यावतीने करण्यात आली आहे.
या पुरस्कार निवडीकरिता साहित्यिक, सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातील स्रीशिक्षिकांकडून, सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांकडून परिचयपत्र मागविण्यात आले होते. त्यातूनच संयोजन समितीने वरील पुरस्कारांची निवड केलेली आहे.
या संमेलनामध्ये महाराष्ट्रातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शाखेमध्ये सेवा करणाऱ्या जास्तीत जास्त स्रीशिक्षिकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन दादा पाटील महाविद्यालय, कर्जतचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी केले आहे.