स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहा… प्रा. अजित पाटील

कर्जत (प्रतिनिधी) :- रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३६ व्या जयंतीनिमित्त दादा पाटील महाविद्यालयात हीरक महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक विभाग आयोजित ‘कर्मवीर सप्ताह, कर्मवीर जीवनदर्शन प्रदर्शन व कर्मवीर व्याख्यानमाला’ दिनांक २१ ते २९ सप्टेंबर २०२३ या कालावधीत संपन्न होत आहे.
सोमवार दिनांक २५ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी दहा वाजता स्पर्धा परीक्षा विभागाच्या वतीने ‘स्पर्धा परीक्षा: स्वरूप व संधी’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन महाविद्यालयाच्या शारदाबाई पवार सभागृहामध्ये करण्यात आले होते. इस्लामपूर येथील कर्मवीर विद्याप्रबोधिनीचे संचालक प्रा. अजित पाटील यांनी या विषयावर मार्गदर्शन केले.
प्रा. अजित पाटील यांनी आपल्या व्याख्यानामध्ये आजची महाविद्यालय ही बेरोजगारी निर्माण करणारे कारखाने आहेत की काय अशी खंत व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात योग्य करिअर निवडावे. सोशल मीडियाचे तुम्ही गुलाम बनू नका. उगवत्या सूर्याच्या किरणाबरोबर धावण्याची स्पर्धा करा. नकार सोसल्याशिवाय नकाराचे होकारात रूपांतर होणार नाही. अंतर्गत ऊर्जा जागृत ठेऊन पेटून उठा व तुमचे स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहा. आपल्या उणिवा दुसऱ्याला सांगू नका. स्पर्धेला भिऊ नका, जोपर्यंत जीवनमरणाचा प्रश्न निर्माण होत नाही तोपर्यंत यश मिळत नसल्याचे प्रतिपादन त्यांनी आपल्या व्याख्यानातून केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अंबादास पिसाळ यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये कठोर प्रयत्न करून यश मिळेपर्यंत थांबू नका असे आश्वासित केले. राजकारणाच्या माध्यमातून मी देखील नेहमी स्पर्धेला सामोरे जात आहे. मात्र जिद्द समोर ठेवून यशस्वी होण्याचा प्रयत्न मी आजपर्यंत केलेला आहे. मनातून उर्मी तयार झाली पाहिजे, स्वतःचे ब्रँड तयार करा असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी आपल्या मनोगतात पंखाला बळ देणारे आपले कॉलेज आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धेचे आयोजन करीत आहोत आणि यातूनच विद्यार्थ्यांमधील राजहंस शोधण्याचे काम महाविद्यालय करीत असल्याची भावना व्यक्त केली.
या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. संजय कांबळे, महाविद्यालयीन विकास समितीचे सदस्य बप्पाजी धांडे, स्पर्धा परीक्षा विभागाचे समन्वयक प्रा. संदीप गोंदके व स्पर्धा परीक्षा समितीचे सर्व सदस्य, महाविद्यालयातील बहुसंख्य प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्वप्निल म्हस्के यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार डॉ. दिग्विजय कुंभार यांनी मानले.