शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सोमवार दि.११ सप्टेंबर रोजी बेमुदत उपोषण: किरण पाटील

कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने कर्जत तहसील कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी सोमवार दि.११ सप्टेंबर रोजी बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले असल्याची माहिती काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किरण पाटील यांनी दिली. पाटील यांनी या निवेदनात म्हटले आहे की सोमवार दि. ११/०९/२०२३ रोजी सकाळी १० वाजता तहसील कार्यालयासमोर कर्जत तालुका काँग्रेस कमिटी च्या वतीने खालील मागण्यासाठी बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे .
कर्जत तालुक्यातील रोजगार हमी योजनां मधील कुशल व अकुशल रेशीओ मधील तफवाती बाबत चौकशी करण्यात यावी. तसेच रोजगार हमी योजनेच्या वैयक्तिक लाभच्या कामांमध्ये मंजूरीसाठी पैश्याचा आर्थिक गैरव्यवहार होत असून त्याची सखोल चौकशी करावी. तसेच कर्जत तालुक्यात पाऊस अतिशय कमी पडल्यामुळे तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात यावा. आणि आपल्या स्तरावरून दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून मागणी असेल त्या ठिकाणी पाण्याचे टँकर त्वरीत सुरु करुन जनावरांसाठी चारा छावण्या चालू कराव्यात.
तसेच तालुक्यात दुष्काळी परिस्थिति निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना शंभर टक्के विमा लागू करून शेतकाऱ्याना नुकसान भरपाई देण्यात यावी . तसेच त्या बाबत त्वरित टंचाई आढावा बैठक घेण्यात यावी.
कुकडीचे सिना धरणामध्ये सोडलेले पाणी बंद केले आहे. ते पुन्हा चालू करण्यात यावे. तसेच २०२२ च्या अतिवृष्टीमुळे नुकसान भरपाई ताबडतोब मिळण्यात यावी. या विविध मागण्यांसाठी सोमवार पासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा किरण पाटील यांनी दिला आहे.