कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीचा पदभार काका,आबांनी स्वीकारला

कर्जत प्रतिनिधी – कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती यांनी आज कृषी उत्पन्न बाजार समितीचा पदभार स्वीकारण्याचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषदेचे आमदार राम शिंदे उपस्थित होते यावेळी आमदार राम शिंदे यांचे उपस्थितीत सभापती काकासाहेब तापकीर यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचा पदभार स्वीकारला यावेळी झालेल्या कार्यक्रमात बोलताना आमदार राम शिंदे म्हणाले की या निवडणूकीत दोन्ही कडे समान नऊ नऊ सदस्य निवडून आले असताना देखील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती व उपसभापती पदाच्या झालेल्या निवडणुकीत भाजपाने दनदनीत विजय मिळवला आहे. जनतेच्या मनात जे असते तेच ईश्वर चिठ्ठीत पण निघते याचा प्रत्यय जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आला होता. त्याच बरोबर जामखेड पाठोपाठ कर्जतला देखील भाजपाचा झेंडा फडकला असे प्रतिपादन आमदार राम शिंदेंनी केले. या कार्यक्रमास जिल्हा सहकारी बँकेचे संचलक अंबादास पिसाळ, नूतन सभापती काकासाहेब तापकीर, उपसभापती अभय पाटील भाजपचे नेते प्रवीण घुले, भाजपचे अध्यक्ष डॉ. सुनील गावडे, शांतीलाल कोपनर कापरेवाडीचे सरपंच अनील खराडे आंबिजळगांव चे सरपंच विलास निकत आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी बोलताना राम शिंदे म्हणाले की, आपल्या भागातील शेतकरी आपला शेती माल विकण्यासाठी इतर तालुक्यात जाणार नाही याची काळजी नूतन संचालकांनी घेतली पाहिजे. कारण कृषी उत्पन्न बाजार समिती ही सर्वसामान्य शेतकऱ्याना न्याय देणारी संस्था आहे. त्यामुळे शेतमालास चांगला हमी भाव मिळण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तसेच शेतकर्यांना मुलभूत सर्व सुखसुविधा उपलब्ध करून देण्यात यावे. यामध्ये काही अडचणी असतील तर सरकार तुमच्या पाठीशी आहे असे शिंदे यांनी सांगितले. पुढे बोलताना शिंदे म्हणाले की मी विधानसभा निवडणुकीत पराभूत झालो तेंव्हा विजयी उमेदवाराने माझ्या घराच्या समोर मिरवणूक काढली होती. परंतु मी त्यांना घरी बोलवत त्यांचा फेटा बांधून सत्कार केला स्वागत केले होते. परंतु मी लगेच अडीच वर्षाने पुन्हा आमदार झालो पण त्यांनी माझे स्वागत नाही केले आणि सत्कार सुद्धा केला नाही. अशा टोलाही शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांचे नाव न घेता लगावला.
यावेळी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अंबादास पिसाळ बोलताना म्हणाले की जिल्ह्यात सर्वात लहान म्हणून ओळख असणारी कर्जतची कृषी उत्पन्न बाजार समिती उद्या निश्चितच सर्वात मोठी आणि कार्यक्षम बाजार समिती करण्याचा मानस सर्व नवनियुक्त संचालकांनी केला असून संस्थेच्या हिताचे निर्णय घेण्यात यावे. परंतु बिनकामाच्या व्यक्तींना अधिकार दिले की ती संस्था रसातळास गेल्या शिवाय रहात नाही. त्यामुळे आगामी काळात सर्वाना सोबत घेऊन कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जातील.
यावेळी पदग्रहण सोहळ्यातील सत्कार समारंभास उत्तर देताना नूतन सभापती काकासाहेब तापकीर म्हणाले की, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या सर्वांगीण हितासाठी हे संचालक मंडळ काम करणार असून तालुक्यातील कर्जत, राशीन तसेच मिरजगाव येथील बाजारात पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यावर भर देणार असून हमाल-मापाडी तसेच व्यावसायिक आणि व्यापारी बांधवासाठी येणाऱ्या सर्व अडी-अडचणी सोडविण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन आमदार राम शिंदे यांच्या माध्यमातून प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध असल्याची ग्वाही दिली.
या कार्यक्रमास प्रवीण घुले, अल्लाउद्दीन काझी, दादासाहेब सोनमाळी, अशोक खेडकर, स्वप्नील देसाई, प्रकाश शिंदे, काकासाहेब धांडे, प्रवीण फलके, अनिल गदादे, अमृत लिंगडे, शेखर खरमरे, पप्पूशेठ धोदाड, सुनील यादव, राहुल गांगर्डे, तसेच कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव सतीश कदम, पदाधिकारी व कार्यकर्ते व मोठय़ा प्रमाणात शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक बापूसाहेब नेटके यांनी केले तर आभार उपसभापती अभय पाटील यांनी मानले.