
कर्जत प्रतिनिधी : नांदेड जिल्ह्यातील बोंडार गावांमध्ये भिमजयंती साजरी केल्याचा राग मनात धरून तरुण अक्षय भालेराव याची हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी मंगळवारी रिपाइंच्यावतीने कर्जत शहर बंदची हाक देत निषेध मोर्चा काढला होता. या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. व्यापारी बांधवांनी दुकाने बंद ठेवून बंदला प्रतिसाद दिला.
शहरातील अक्काबाईनगर येथून पोलिस ठाण्यापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता कदम, युवकचे जिल्हाध्यक्ष विशाल काकडे, नगरसेवक भास्कर भैलुमे, रवींद्र दामोदरे यांनी घटनेचा निषेध करत आरोपींना कठोर शासन व्हावे, अशी मागणी केली. तसेच भालेराव याच्या
कुटुंबाला शासनाने तातडीने आर्थिक मदत करावी. तसेच त्याच्या कुटुंबातील एका व्यक्तिला शासकीय नोकरी देत पुनर्वसन करावे.
या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक अरुण पाटील यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी अजय भैलुमे, संतोष आखाडे, सनी येलेकर, वसीम शेख, किरण भैलुमे, विजय साळवे, धीरज पवार, सागर भैलुमे, सुरज सातव, करण ओहोळ, बाळा आखाडे, दादा आखाडे, दादा कांबळे, सिद्धांत कदम, शाहरुख पठाण, प्रतीक सदाफुले आदी उपस्थित होते. व्यापारी बांधवांनी सर्व व्यवहार बंद ठेवत कर्जत बंदला प्रतिसाद दिला होता.