अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यादेवी नगर होत आहे हे आमच्या सरकारचे भाग्य आहे:- एकनाथ शिंदे.

कर्जत (प्रतिनिधी) :- अहमदनगर जिल्ह्याचे नाव पुण्यलोक अहिल्यादेवीनगर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हे नाव देण्याचे काम आमच्या सरकारच्या काळात होत आहे. हे आमचे भाग्य आहे असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ वी जयंतीनिमित्त जामखेड तालुक्यातील जन्मगाव चोंडी येथे जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे, खासदार सुजय विखे, सदाशिव लोखंडे, आमदार प्रा राम शिंदे, गोपीचंद पडळकर, बबनराव पाचपुते, सुरेश धस, मोनिका राजळे, माजी आमदार शिवाजी कर्डीले माजीमंत्री अण्णासाहेब डांगे, प्रा लक्ष्मणराव ढोबळे, माजी खासदार विकास महात्मे, माजी आमदार नारायण पाटील, रामहरी रुपनवर पोपटराव गावडे, अनंतकुमार पाटील, भिमराव धोंडे, बाळासाहेब मुरकुटे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे माहेरकडील वंशज बाबासाहेब शिंदे पाटील, उज्वला हाके, डॉ. शशिकांत तरंगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य हिमालयाच्या उंची प्रमाणे होते, नामकरणामुळे नगरचे नावही हिमालयाएवढे उंचावणार असल्याचे सांगून, मुख्यमंत्री शिंदे यानी अहिल्यादेवींच्या कार्याचा गौरव केला तसेच या नामकरण सोहळ्याचे साक्षीदार होता आले हे सरकारचे आमचे भाग्य असल्याचा उल्लेखही केला दोन वर्षांनी अहिल्यादेवींची ३०० जयंती होत आहे. ही जयंती भव्य स्वरूपात व सर्वांना हेवा वाटेल अशी साजरी केली जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे आदर्श डोळ्यापुढे ठेवून आम्ही राज्याचा कारभार करत आहेत.
अहिल्यादेवींच्या मागच्या वर्षीच्या जन्मोत्सवात अहिल्यादेवी भक्तांना खूप त्रास झाला मात्र त्यानंतर २० दिवसातच आम्ही सरकार उलथून टाकले, असे सूचक टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी मविआ सरकारचे नाव न घेता करताच उपस्थितांनी जल्लोष करीत प्रतिसाद दिला राज्यात सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम आम्ही करत आहोत. अनेक शेतकरी हिताचे निर्णय घेतले आहेत. असे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले धनगर समाजासाठी शेळी मेंढी सहकार विकास महामंडळाची स्थापना करून, १० हजार कोटी रूपयाचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सरकार हिंदुत्ववाद्यांचे असल्यामुळे छत्रपती संभाजीनगर व धाराशिवचे नामकरणाचा निर्णय घेतला, त्याचप्रमाणे अहमदनगरच्या नामकरणही झाले पाहिजे, मुख्यमंत्री त्यासंदर्भातील निर्णय घेतील. आपण मुख्यमंत्री असताना धनगर समाजासाठी १ हजार कोटी रुपयांचा निधी दिला होता. मात्र मध्यंतरी सरकार बदलल्यावर धनगर समाजाला एक फुटकी कवडीही दिली गेली नाही. शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा एक हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे धनगर समाजासाठी दरवर्षी २५ हजार घरे बांधली जाणार
आहेत. धनगर समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मला व मुख्यमंत्री शिंदे यांना अहिल्यादेवींचा आर्शीवाद मिळो अशी सदिच्छा व्यक्त केली. अहिल्यादेवींच्या वाही संघर्ष होता तो आपल्याला समाजाच्या उत्कर्षासाठी करावा लागेल. धनगर समाजाच्या मनातील सर्व मागण्या आम्ही पुर्ण करणार आहोत. राज्यातील एकही धनगर बेघर राहणार नाही. यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तसेच राखीय चराई क्षेत्र धनगरवाड्यांना जोडावे या सरखी तरतूद केली आहे. अहिल्यादेवी नसत्या तर या देशात काशी आणि शिवांची मंदिरे दिसली नसती त्यांनी पायाभूत सुविधा उभारून सामान्य माणसाला न्याय दिला न्यायप्रिय शासन त्यांनी चालवले प्रास्ताविक भाषणात आमदार प्रा राम शिंदे म्हणाले, पुण्याश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चोंडी हे सर्वप्रथम प्रकाशझोतात आणण्याचे काम भाजपा शिवसेना युती सरकारनेच केले आहे. तत्कालिन मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी अडगळीत पडलेल्या या जन्मभूमीत अनेक विकास कामांच्या माध्यमातून कायापालट केला. त्यामुळे आज चोडीचे चित्र बदलताना दिसत आहे. हाळगाव येथे ६५ कोटी रूपये खर्चुन सरकारी कृषी महाविद्यालय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने सुरू केले. सोलापुर विद्यापीठाचे नामांतर देवेंद्र फडणवीस यांनी करून अहिल्यादेवी हाेळकरकराचे नाव दिले. याचबरोबर अहिल्यादेवी जयंती शासनाच्या वतीने साजरी करण्यासाठी निर्णय घेतला.
आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, सत्तेचा माज असणारे लबाड लांडग्यांचे सरकार हकलून लावले आहे. चाँडीत होणारा कार्यक्रमातील सन्मान व अपमान समाज लक्षात ठेवतो, अनेक सरकार आले आणि गेले. मागील सरकारला याची जाणीव नव्हती. मागच्या सरकारने मागच्या वर्षी अहिल्या मातांचा अवमान केला त्यामुळे सरकार गेले, असा दावाही त्यांनी केला. यावेळी केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचा दूरध्वनी संदेश प्रसारित करण्यात आला. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी आभार मानले.