घरकुल योजनेत राबवलेल्या अभियानात ४ महिन्यात सर्वाधिक उद्दिष्ट्य पूर्ण केल्याने कर्जत-जामखेडच्या शिरपेचात मानाचा तुरा

कर्जत (प्रतिनिधी) :- महा आवास योजनेअंतर्गत राज्यभरात २० नोव्हेंबर-२०२२ पासून घरकुलाचे सर्वाधिक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अभियान राबविण्यात आले होते. या अभियानांतर्गत टप्पे ठरवून त्या टप्प्यांवर घरकुलाचे कामे पूर्ण करण्यास प्राधान्य देण्यात आले. राज्यभरातील घरकुलांच्या कामांना गती देण्याचा याद्वारे सरकारचा प्रयत्न होता. अखेर या अभियानाची नुकतीच आकडेवारी जाहीर झाली असून अहमदनगर जिल्ह्याने राज्यातील इतर जिल्ह्यांना धोबीपछाड देत १० हजार १९९ घरकुल पूर्ण करून संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
विशेष म्हणजे जिल्ह्यात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या तालुक्यात १३२६ घरकुल पूर्ण करून जामखेड तालुका प्रथम क्रमांकावर तर १२८२ घरकुल पूर्ण करून कर्जत तालुका तिसऱ्या क्रमांकावर आहे. अशा पद्धतीने विक्रमी टप्पा गाठत कर्जत जामखेड तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार नागरिकांशी वेळोवेळी संवाद साधून, सरकारी योजनेची माहिती नागरिकांपर्यंत पोचवण्यासाठी कायमच प्रयत्नशील असतात. पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून कर्जत व जामखेडमध्ये बैठका घेऊन त्यांनी वेळोवेळी अनेक प्रश्न मार्गी लावले तसेच नागरिक आणि अधिकारी यांच्या वारंवार संपर्कात राहून व शासकिय पातळीवर केंद्र सरकारकडेही त्यांनी घरकुलांबाबत पाठपुरावा केला होता.
लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यात योग्य समन्वय असेल तर नक्कीच अशा पद्धतीची उल्लेखनीय कामगिरी करता येते याचं उत्तम उदाहरण कर्जत-जामखेड मतदारसंघात वेळोवेळी पाहायला मिळत आहे. अशा पद्धतीने कर्जत जामखेड मतदारसंघाने नगर जिल्ह्यात आपला वरचष्मा कायम ठेवला असल्याचं सिद्ध झालं आहे. मागच्याच वर्षी घरकूल योजनेत जामखेडचा नाशिक विभागीय स्तरावर दुसरा क्रमांक देखील आला होता आणि यंदाच्या वर्षी जामखेड नगर परिषदेने घरकुल योजनेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला होता. तसेच आता ही आकडेवारी पाहिल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे स्थानिक आमदार रोहित पवार व प्रशासकीय अधिकारी प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना हक्काचे घर मिळावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न आणि सहकार्य करत होते ज्याचे फळ आता पाहायला मिळत आहे.
– रोहित पवार
(आमदार कर्जत जामखेड विधानसभा)