दादा पाटील महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त परिसंवाद व कविसंमेलनाचे आयोजन

कर्जत (प्रतिनिधी) :- रयत शिक्षण संस्थेचे, दादा पाटील महाविद्यालय कर्जत येथे ‘मराठी भाषा गौरव दिन’ तथा वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी विभागाच्या वतीने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकरिता ‘विज्ञान व तंत्रज्ञानाचे शिक्षण मातृभाषेतून असावे की नसावे?’ या विषयावरील परिसंवादाचे व कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून साईकृपा कला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. विक्रम कांबळे व दादा पाटील महाविद्यालयाचे माज़ी मराठी विभाग प्रमुख प्रा.भास्कर मोरे हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर होते. तसेच या कार्यक्रमाला विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ.संजय ठुबे, मराठी विभागाचे प्रा. सुखदेव कोल्हे, डॉ. भारती काळे, प्रा. मीना खेतमाळीस, प्रा. वृद्धेश्वर गरुड, प्रा. पवन घालमे व मोठया संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
विज्ञान व तंत्रज्ञानाचे शिक्षण मातृभाषेतून असावे की नसावे? या विषयावरील परिसंवादामध्ये महाविद्यालयातील सृष्टी घेमरुड, वैष्णवी भोसले, साक्षी वाघ, वैष्णवी गायकवाड, त्रिवेणी वाघमारे, आदित्य कापसे, ऋतुजा शेटे, रोहिणी भुते या विद्यार्थ्यांनी आपली मते उत्स्फूर्तपणे मांडताना विज्ञान व तंत्रज्ञानाचे शिक्षण हे मातृभाषेतूनच असायला हवे अशी भूमिका बऱ्याच विद्यार्थ्यांनी मांडली. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित केलेल्या विद्यार्थ्यांकरिताच्या कविसंमेलनामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी स्वरचित ‘देश आमचा देशात उरलाच नाही, कोरोना काळातील शेतकरी, सागर, आयुष्य, शिक्षक, आई, बाप, प्रेम’ आदि विषयांवर वैष्णवी पवार, वैष्णवी गदादे, वेदिका गोंदकर, सृष्टी घेमरुड, वैष्णवी भोसले, वैष्णवी गायकवाड, साक्षी वाघ, त्रिवेणी वाघमारे, प्राजक्ता जगताप, दिपाली पवार, सृष्टी ठोंबरे, प्रतीक मुंडे, साक्षी भांडवलकर, अस्मिता ढवळे, विद्या कात्रजकर, आदित्य कापसे, मयुरी गुंडगिरे, वैष्णवी भिसे, वैष्णवी पवळ, रोहिणी भुते, सुजाता देशमुख या विद्यार्थ्यांनी स्वरचित कविता सादर केल्या.
परिसंवादामध्ये विद्यार्थ्यांनी मांडलेल्या भूमिकेला अनुसरून प्रा. भास्कर मोरे यांनी आपले मत मांडले. मातृभाषेतून ज्ञान व तंत्रज्ञानाचे शिक्षण असायलाच हवे असे नमूद केले. माता, मातृभाषा, मातृभूमी या तीन गोष्टींना आपण कायम महत्व देत आलो आहोत. जगामध्ये ६९१२ भाषा असल्याचे
निरीक्षण त्यांनी मांडले. भाषेचे संवर्धन करणे ही आपली सर्वांची जबाबदारी असल्याने भाषा नामशेष होणार नाहीत याची काळजी सर्वांनी घ्यावी असा सल्ला यावेळी त्यांनी दिला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे साईकृपा कला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. विक्रम कांबळे यांनी आई, बाबा, निसर्ग, सामाजिक समस्या आदि विषयांवर विद्यार्थ्यांनी काव्यरचना सादर केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. पूर्वीच्या काळी साहित्य हे काव्यातून लिहिले जात आहे. कवितेमधून सत्य मांडायला हवे. कवितेला जर चाली लावल्या तर
त्या रसिकांपर्यंत सहज पोहोचतात. शालेय वयात या पद्धतीनेच आपल्याला कविता शिकविलेल्या आहेत. कविता ह्या ठरवून लिहिल्या जात नाही तर कविला काव्य लेखनाचा झटका आल्यावरच कवितेची निर्मिती होत असते. यानिमित्ताने त्यांनी स्वतः लिहिलेल्या अनेक कवितांचे सादरीकरण करून काव्यलेखन कसे करावे याचा वस्तूपाठ विद्यार्थ्यांसमोर सांगितला.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ संजय नगरकर यांनी परिसंवाद व कविसंमेलनामध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. आजचा महाविद्यालयीन विद्यार्थी काय विचार करतो, काय लिहितो याची चाचपणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने लक्षात आल्याचे त्यांनी सांगितले. शालेय शिक्षण हे मातृभाषेतूनच असायला हवे हे मानसशास्त्रज्ञांनी देखील सिद्ध केले आहे. प्रत्येक जण स्वतःचा विचार, चिंतन, मनन मातृभाषेतूनच करत असतो. वयाच्या सहाव्या वर्षापर्यंत लहान मूल पूर्ण वाक्य बोलू शकते. तिथूनच त्याचे शिक्षण हे औपचारिक व अनौपचारिक स्वरूपात सुरू झालेले असते. काकोडकर, डॉ विजय भटकर आदि संशोधकांनी मातृभाषेतून शिक्षण घेऊनच आपल्या क्षेत्रामध्ये सर्वोच्च स्थान प्राप्त केले आहे. मराठी भाषेला जवळपास पावणे दोन हजार वर्षांची परंपरा आहे. कॉपी-पेस्ट व फॉरवर्ड परंपरेमुळे आजची तरुण पिढी भाषिक
विकास खुंटवते की काय अशी शंका व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागाचे प्रा. सुखदेव कोल्हे यांनी तर आभार प्रा. मीना खेतमाळीस यांनी मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. भारती काळे व प्रा. स्वप्निल मस्के यांनी केले. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कविता सादर करताना कु. रोहिणी भुते
सोबत प्रा. सुखदेव कोल्हे, प्रा. विक्रम कांबळे, प्राचार्य डॉ. संजय नगरकर, प्रा. भास्कर मोरे, डॉ. संजय ठुबे