शिक्षकांनी माणुसकीची ज्योत विद्यार्थ्यांमध्ये पेटवावी…प्राचार्य डॉ. संजय नगरकर.

कर्जत (प्रतिनिधी) :- डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणून ५ सप्टेंबर रोजी ‘शिक्षक दिन’ सर्व भारतभर साजरा करण्यात येतो. रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयातील स्टाफ वेल्फेअर व सांस्कृतिक विभागाच्या वतीने महाविद्यालयामध्ये शिक्षक दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य व माजी मुख्याध्यापक मा. श्री भानुदास नेटके उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर होते.
याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक वर्ग यांचा पेन व गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
‘माझा वाढदिवस माझे पुस्तक भेट’ हा उपक्रम महाविद्यालयात राबविण्यात येतो. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालयाच्या मराठी विभागास पाच हजार रुपयांची पुस्तके भेट दिली व गरीब विद्यार्थी सहाय्यता निधीकरिता पाच हजार रुपयाची देणगी महाविद्यालयाला दिली.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व माजी मुख्याध्यापक भानुदास नेटके यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांवर संस्कार करण्याची जबाबदारी शिक्षकांवर असल्याचे सांगितले. आदर्श शिक्षक पुरस्काराचे गैरवाजवी स्वरूप राजकीय हस्तक्षेपाने पूर्वी होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. शिक्षक दिनानिमित्त समाजातील घटकांनीच शिक्षकांचा आजच्या दिवशी सन्मान करायला पाहिजे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. जास्तीत जास्त चांगले ज्ञान विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करा असा संदेश त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी आपल्या मनोगतामध्ये शिक्षकांना पूर्वीपासूनच गुरुतुल्य स्थान कसे आहे हे पटवून दिले. तरीदेखील काही घटकांकडून शिक्षकांच्या पगारावरून शिक्षकांची हेटाळणी केली जाते हे चांगले लक्षण नसल्याची खंत व्यक्त केली. शिक्षक नेहमी स्वयंप्रेरणेने विद्यार्थ्यांना उभे करत असतो. शिक्षक हे आईचे दुसरे रूपच असते. कसलाही तिरस्कार न करता प्रत्येक विद्यार्थ्याप्रती शिक्षकाला प्रेमच असते. शिवाय कोणत्याही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान व्हावे असा विचार शिक्षक कधी करत नाही. शिक्षक नेहमी माणुसकीची ज्योत विद्यार्थ्यांमध्ये पेटवतो. यावेळी त्यांनी कुसुमाग्रजांच्या कणा या कवितेचा दाखला सांगितला. सानेगुरुजी यांनी शिक्षकाची भूमिका मातृत्वरूपाने व उत्तमरित्या सांभाळलेली होती. सुंदरतेची निर्मिती करणारे शिल्पकार हे शिक्षकच असतात. ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाच्या निमित्ताने सर्व शिक्षकांचा सन्मान व्हावा हा एकमेव उद्देश असल्याकारणानेच आजचा शिक्षक दिन साजरा होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा व जिमखाना प्रमुख डॉ. संतोष भुजबळ यांनी केले. तर आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. प्रमोद परदेशी यांनी मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्वप्निल मस्के यांनी केले.