मिरजगावमध्ये कडकडीत बंद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबनेचा तीव्र निषेध

मिरजगाव (ता. कर्जत) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परभणी येथील पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना आणि भिमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीत झालेल्या संशयास्पद मृत्यूच्या निषेधार्थ आज मिरजगाव शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. या घटनेमुळे दलित समाजात तीव्र संताप व्यक्त होत असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी समस्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती आणि भीमसैनिकांनी केली आहे.
बंदमध्ये मांडण्यात आलेल्या मागण्या:
1. संविधान प्रतिकृतीची विटंबना: परभणीतील घटनेतील दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करून न्याय मिळवून द्यावा.
2. पोलीस कारवाई संशयास्पद: परभणीतील पोलीस दंगल प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याने जबाबदार पोलिसांवर कायदेशीर कारवाई करावी.
3. सोमनाथ सुर्यवंशी प्रकरण: पोलीस कोठडीत मृत्युमुखी पडलेल्या सोमनाथ सुर्यवंशी यांच्या हत्येस कारणीभूत पोलिसांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून, सीबीआय चौकशी करण्यात यावी.
4. आर्थिक मदत आणि नोकरी: सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देऊन त्याच्या कुटुंबातील सदस्यास सरकारी नोकरीत नियुक्त करावे.
5. भिमसैनिकांवरील गुन्हे मागे घेणे: दंगलीच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या भिमसैनिकांवरील सर्व गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत.
6. दलित अत्याचार प्रतिबंधक कायदा: दलित समाजावरील अन्याय आणि अत्याचार थांबवण्यासाठी नव्या दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याची निर्मिती करून त्याची कठोर अंमलबजावणी करावी.
शहरातील जनतेचा पाठिंबा:
मिरजगाव शहरातील सर्व व्यवसाय, दुकाने आणि वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली. भिमअनुयायांनी शांततापूर्ण मार्गाने या बंदचे आयोजन केले असून, प्रशासनाकडून तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
भीमसैनिकांनी चेतावणी दिली आहे की, जर त्यांच्या मागण्या लवकरच पूर्ण केल्या नाहीत, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. या प्रकारामुळे मिरजगाव आणि आसपासच्या परिसरात संतापाचे वातावरण आहे.