
कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत तालुक्यातील राशीन येथील २जुगार अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. या दोघांकडून रोकड रक्कम तसेच जुगार खेळण्याचे साहित्य जप्त केले. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विशाल रवींद्र क्षीरसागर यांनी राशीन पोलीस दुरक्षेत्र येथे फिर्याद दिली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, पोलीस नाईक संभाजी वाबळे, अर्जुन पोकळे हे राशीन दुरक्षेत्र येथे हजर असताना पोलीस नाईक वाबळे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, राशीन गावातील मंगळवार पेठेत टपरीच्या आडोशाला एक इसम लोकांकडून पैसे घेवुन लोकांना वेगवेगळ्या आकड्याच्या चिठ्ठ्या देवून कल्याण मटका नावाचा हार
जितीचा जुगार खेळीत व खेळवित आहे. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने खासगी गाडीने तेथे जावून खात्री केली असता मंगळवार पेठेत टपरीचे आडोशाला एक इसम लोकांकडून पैसे घेवून कल्याण मटका नावाचा हारजितीचा जुगार खेळताना व खेळविताना दिसला. पोलिसांनी छापा घालून त्याला जागीच पकडले. त्यास त्याचे नाव, गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सुरेश चिमा आढाव, वय: ६०, रा. राशीन असे सांगितले. पोलिसांनी त्याची झडती घेवून त्यांच्याकडील रोकड व जुगार खेळण्याचे साहित्य जप्त केले.
दुसरी कारवाई राशीन येथील शिवाजी चौक येथे करण्यात आली. चौकातील टपरीच्या आडोशाला एकजण कल्याण मटका नावाचा हारजितीचा जुगार खेळीत व खेळवित असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी तेथे जावून छापा टाकला. या कारवाईत दिलीप नेमाजी साळवे, वय: ६०, रा. राशीन याला ताब्यात घेवून त्याच्याकडून रोकड तसेच जुगार खेळण्याचे साहित्य जप्त केले. अधिक तपास कर्जत पोलीस करत आहेत.