Advertisement
ब्रेकिंग

काहीतरी करू शकतो हा ध्यास घेतलेला तरुण यशस्वी होऊ शकतो ; यजुर्वेंद्र महाजन

Samrudhakarjat
4 0 1 9 1 2

कर्जत (प्रतिनिधी) :- रयत शिक्षण संस्थेचे, दादा पाटील महाविद्यालयात हीरक महोत्सवी वर्ष व कर्मवीर जयंती सप्ताहनिमित्त माजी विद्यार्थी संघ व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आयोजित ‘चला यशस्वी होऊया’ या विषयावर यजुर्वेंद्र महाजन यांचे व्याख्यान महाविद्यालयाच्या शारदाबाई पवार सभागृहामध्ये संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी विद्यार्थी संघाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब साळुंके होते. या कार्यक्रमाला माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुभाषचंद्र तनपुरे, सागर लाळगे, अमित तोरडमल, तात्यासाहेब ढेरे, सागर मांडगे, विजय तोरडमल आदि माजी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

‘चला यशस्वी होऊया’ या विषयावरती बोलताना यजुर्वेंद्र महाजन यांनी सांगितले की, आभार व्यक्त करणे हे कृतज्ञतेचे लक्षण आहे. मातेच्या स्तरावर जाऊन विचार करतो त्याला मास्तर म्हटले जाते. शेती ही आव्हान पेलवणाऱ्याकडूनच केली जात असल्याने शेतकरी आईवडिलांचा अभिमान बाळगा. आयुष्यामध्ये कोणाला प्रोत्साहन देता नाही आले तरी चालेल परंतु नाउमेद कोणाला करू नका. दुःखाचे व अडचणीचे मूळ कारण भीती असल्याचे स्वामी विवेकानंद सांगतात. चिडवणे, डिवचणे, भांडणे आदि त्रास देणाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याने आपली भीती दूर निघून जाते. नम्रता ठेवली तर आपोआप यश व मदत मिळत जाते. तरुणांची प्रत्येक कृती ही सर्वोत्तमच असते. जिथे जाऊ तिथे उत्तमच कार्य करू अशी ऊर्जाही तरुणांमध्ये असते.

तरुण मुले आपल्यातील ऊर्जेचा पुरेपूर वापर करत नाहीत, आपण कोणत्या विचाराने कृती करतोत यावर यश अवलंबून असते. हुशार मुलांसोबत तुलना न करता त्यांच्याकडून प्रेरणा घेतली गेली पाहिजे. आपण सर्वजण महान कार्यासाठी जन्माला आलो आहोत हे ध्येय बाळगून शिक्षण कार्यात स्वतःला झोकून द्या. ‘आहे रे’ व ‘नाही रे’ या दोन गटांपैकी ‘आहे रे’ गटाशी कायम निगडित रहा. उत्तम नियोजन केले तर यश निश्चित मिळत असल्याची भावना यावेळी यजुर्वेंद्र महाजन यांनी व्यक्त केली.

अध्यक्षीय भाषणामध्ये बाळासाहेब साळुंके यांनी सांगितले की, अनेक गोष्टींचा त्याग करून निरपेक्ष भावनेने राष्ट्रीय कार्यात अथक परिश्रम केल्यानेच महात्मा ही पदवी गांधीजींना प्राप्त झालेली आहे. आई वडील आपली स्वप्ने मुलांकडून पूर्ण होण्याचे पाहत असतात. अशी स्वप्ने सर्व विद्यार्थ्यांनी पूर्ण केली तरच आई वडिलांकारिता खरी उतराई होईल. सर्वस्व पणाला लावून एखादे कार्य तुम्ही करत असताना लोक तुम्हाला वेडे जरी म्हणत असतील, तरी तुम्ही यशस्वी वाटेवरून चाललेला आहात अशी खात्री बाळगून राहा. गुरूंचा उपदेश कधीही मौल्यवानच ठरतो. संगतही चांगल्यासोबत ठेवण्याचा सल्ला याप्रसंगी बाळासाहेब साळुंके यांनी दिला.

नुकताच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा विभागीय स्तरावरचा द्वितीय क्रमांक पुरस्कार ‘कर्मज्योती’ या नियतकालिकास मिळाल्याबद्दल सदर नियतकालिकाचे संपादक प्रा. भास्कर मोरे व संपादक मंडळातील सदस्यांचा सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी केले.

या कार्यक्रमाचे संयोजन प्राचार्य डॉ. संजय नगरकर, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री. सुभाषचंद्र तनपुरे, समन्वयक प्रा. प्रकाश धांडे, प्रा. संदीप गोंदके व समन्वयक सदस्यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. स्वप्निल म्हस्के व प्रा. राम काळे यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker