दादा पाटील महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षक कीर्तन महोत्सवाची सांगता ह.भ.प. पुंडलिक महाराज जंगले शास्त्री यांच्या कीर्तनाने संपन्न
संत विचाराने मनुष्य घडतो...ह.भ.प. पुंडलिक महाराज जंगले शास्त्री

कर्जत (प्रतिनिधी) :- रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयात श्री. ज्ञानेश योग आश्रम संस्था, डोंगरगण, तालुका जिल्हा नगर येथील ‘डोंगरगण ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा’ गुरुवार दि. २२ जून रोजी रात्री महाविद्यालयाच्या प्रांगणात मुक्कामी होता. या दिंडीचे दिंडीचालक ह.भ.प. पुंडलिक महाराज जंगले शास्त्री डोंगरगण हे आहेत. महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये सायंकाळी सात वाजता ह.भ.प. पुंडलिक महाराज जंगले शास्त्री डोंगरदन यांचे हरिकीर्तन कर्जत ग्रामस्थ, महाविद्यालयातील सेवकवर्ग, विद्यार्थीवर्ग यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
यावेळी ह.भ.प पुंडलिक महाराज जंगले शास्त्री यांनी *’मी अवगुणी अन्यायी| किती म्हणोन सांगो काई| आता मज पायीं| ठाव देई विठ्ठले’* या संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगरचनेला अनुसरून कीर्तनसेवा केली. यावेळी बोलताना महाराजांनी सध्याच्या राष्ट्रीय संत, स्वयंघोषित संत जमान्यात शास्राला अनुसरून कीर्तने होत नसल्याची खंत व्यक्त केली. ग्रंथ वाचून कीर्तन करावे, असे संत तुकाराम महाराजांनी सांगितलेले आहे. अपराधाची प्रतवारी करता येत नाही, शिवाय गरीब श्रीमंत असा भेदभावही करता येत नाही. लोकनिती, शास्रनिती नाकारणारे पशुवत असतात. मानवी देहाला जे करायला सांगितले जाते ते न करणे म्हणजेच अपराध करणे होय. गृहस्थ, ब्रह्मचारी, वानप्रस्थ, संन्याशी यामधील लोक आपले कर्म विसरून वागत असतील तर तो अपराध ठरतो.
नरसिंह पुराणात ३२ अपराध सांगितलेले आहेत. स्वतःच्या मनाने ठरविलेली कोणतीही गोष्ट लज्जास्पद असू शकतेे. जगात एकसारखे काहीही नसते. भारतात नाकारलेली एखादी कृती परदेशात प्रिय ठरू शकते. मनुष्याला जन्ममरणाची, कुकर्माची, त्रास देण्याची, खोटे बोलण्याची लाज वाटायला पाहिजे. संत विचारानेच मनुष्य घडणार आहे. आजच्या काळात तरुण मुलींच्या होत असलेल्या आत्महत्या हा चिंतेचा विषय बनलेला आहे. वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून तरुण पिढीवर बौद्धिकतेच्या माध्यमातून संस्कार व उपदेश करण्याची सध्या नितांत गरज असल्याचे प्रतिपादन ह.भ.प. पुंडलिक महाराज जंगले शास्त्री यांनी व्यक्त केले.
आषाढी वारीनिमित्त दरवर्षी विद्यार्थी शिक्षक कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले जाते. यावर्षी हा महोत्सव तीन दिवसांचा करण्यात आला. मंगळवार दिनांक २१ जून २०२३ रोजी ह.भ.प प्रथमेश महाराज जाधव व बुधवार दिनांक २२ जून रोजी ह.भ.प. तेजश्री महाराज दिंडे यांची हरिकीर्तने संपन्न झाली.
दादा पाटील महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या या ‘विद्यार्थी शिक्षक’ कीर्तन महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील महाविद्यालय विकास समिती, प्राचार्य डॉ. संजय नगरकर, सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर सेवक, महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग, माजी विद्यार्थी संघटना, जिमखाना विभाग, एन.सी.सी. विभाग, एन.एस.एस. विभाग, पॅरा मिलिटरी विभाग, यीन विभाग यांनी विशेष परिश्रम घेतले.
द्योजक भीमराव(आप्पा) नलवडे, प्राचार्य डॉ. संजय नगरकर, उपप्राचार्य डॉ. संजय ठुबे, डॉ. प्रमोद परदेशी, प्रा. भागवत यादव, प्रा. प्रतापराव काळे, प्रा. मोहनराव खंडागळे यांच्यावतीने सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले होते.