सकाळ उद्योग समूहाने कायम सामाजिक बांधिलकी जपली ; राजेंद्र फाळके

कर्जत (प्रतिनिधी) :- महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी सकाळ माध्यम समूहाचे यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) च्या माध्यमातून कला महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी हा कला महोत्सव दादा पाटील महाविद्यालयाच्या शारदाबाई पवार सभागृहामध्ये नुकताच संपन्न झाला.
या कला महोत्सवासाठी दादा पाटील महाविद्यालय कर्जत, सद्गुरु ग्रामविकास प्रतिष्ठान कर्जत, पी. जे. कन्स्ट्रक्शन कर्जत यांचे प्रायोजकत्व या लाभले आहे.
या कला महोत्सवाचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्रतात्या फाळके यांच्या हस्ते संपन्न झाले. उद्घाटनपर मनोगतात राजेंद्रतात्या फाळके यांनी सांगितले की, सकाळ उद्योग समूहाने कायम सामाजिक बांधिलकी जपली आहे. मुलांना नेतृत्व करण्याची संधी या कला महोत्सवातून निर्माण करून दिली आहे. त्याचबरोबर ऍग्रोवनच्या माध्यमातून शेतीविषयक वैविध्यपूर्ण माहिती सकाळ उद्योगसमूह सर्वांपर्यंत पोहोचवत असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
याप्रसंगी दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी कला महोत्सवाला शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमधून जवळपास ६०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे.
या महोत्सवामध्ये एकपात्री अभिनय , स्टॅन्डअप कॉमेडी, स्किट ,मूकअभिनय, फॅशन शो, पथनाट्य, एकल गायन, वक्तृत्व, वाद-विवाद व काव्यवाचन, कोलाज वर्क व मेहंदी, चित्रकला व व्यंगचित्र, क्ले वर्क, नृत्य, रांगोळी अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
या उद्घाटनाला राज्य समन्वयक अनिकेत मोरे, अहमदनगर जिल्हा समन्वयक विष्णू नाझरकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख व उपप्राचार्य डॉ. प्रमोद परदेशी, सागर लाळगे, अमित तोरडमल, दादा पाटील महाविद्यालयातील ‘यिन’ ची टीम तसेच बहुसंख्य स्पर्धक विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्निल म्हस्के व प्रा. राम काळे यांनी केले.