आरोपींना धाक तर सर्वसामान्यांना आधार वाटणारे पो. नी. चंद्रशेखर यादव यांची बदली

कर्जत (प्रतिनिधी):- कर्जत तालुक्यात आपल्या कार्यपद्धतीने वेगळी छाप निर्माण करणारे, कायद्याचा गुंडांना, आरोपींना धाक तर सर्वसामान्यांना आधार वाटण्या साठी वातावरण निर्माण करणारे कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात प्रशासकीय बदली झाली आहे. त्याच्या बदलीच्या माहिती ने तालुक्यात हळहळ व्यक्त होऊ लागली असून अजून काही दिवस यादव यांची तालुक्याला गरज असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. कर्जत येथे यादव यांच्या जागी नेवासा येथे कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक विजय मारुती करे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे आदेश पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी काढले आहेत.
कर्जत तालुक्यात रस्त्यावर वाहन उभे करण्यासाठी दोरीचा वापर करून व्यवस्थेला दोरीत आणणारे अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी आपली ओळख निर्माण के, मुलींना महिलांना सुरक्षित वाटावे यासाठी विविध शाळांमध्ये
उपक्रम राबविणारे, ठीकठिकाणी सीसीटीव्ही बसवणे, ग्राम सुरक्षा यंत्रणेचा प्रभावी वापर करणारे, गुन्हेगारांना धाकात ठेवत कायदा व सुव्यवस्था सुरळीत करणारे, पत्रकारा बरोबर सलोख्याचे संबंध ठेवत त्यांचा खुबीने वापर करणारे, पोलीस व पत्रकारा बरोबर सामजिक सलोखा क्रिकेट चषक आयोजित करणारे नारी शक्ती वर विशेषांक प्रसिद्ध करून तो घराघरात पोहचविणारे, सावकारासाठी कर्दन काळ ठरलेले व अनेक लोकांना सावकारी पाशातून मुक्त करणारे, कर्जत पोलीस स्टेशन चे रुपडे बदलणारे, सर्वसामान्य व्यक्तीला आपला फोन नंबर देऊन आपल्या चेंबर मध्ये थेट येण्याचे आवाहन करणारे अधिकारी म्हणून सर्वांना आपलेसे झालेले पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी कर्जत मध्ये गेली दोन वर्ष अत्यंत चांगले काम करत कायदा सुव्यवस्था सुधारण्यासाठी विशेष काम केले असून कार्यकाळ संपल्यानंतर आज झालेल्या प्रशासकीय बदल्यामध्ये यादव यांची नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात प्रशासकीय बदली झाली आहे. कर्जत येथे यादव यांच्या जागी नेवासा येथे कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक विजय मारुती करे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे आदेश पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी काढले आहेत.
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी कर्जत येथे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत तालुक्यात कर्तबगार अधिकारी म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली असल्याने सर्व सामान्यांना ते हवेहवेसे वाटू लागले होते त्यामुळे त्याच्या बदलीनंतर तालुक्यात कशा प्रतिक्रिया व्यक्त होतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
पो नी. यादव यांच्या निरोपासाठी सकाळ पासून अनेकांनी प्रत्यक्ष भेटून सत्कार केला तर सायं कर्जत पोलीस स्टेशन मध्ये झालेल्या कार्यक्रमात सर्व सामाजिक संघटना, पत्रकार संघटना, पोलीस पाटील, कार्यालयीन कर्मचारी, पोलीस अधिकारी यांनी घेतलेल्या निरोप समारंभात सर्व सामाजिक संघटनाच्या वतीने राहुल नवले, भाऊसाहेब राणमाळ, पोलीस पाटील संघटनेच्या वतीने पाटील व जयश्री वाघमारे, पदवीधर पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष आशिष बोरा यांनी मनोगते व्यक्त करत पो. नी. यादव यांच्या कार्याचा उल्लेख करत अनेक अनुभव कथन केले यावेळी सर्वाच्या सत्काराला उत्तर देताना यादव भावनिक झाले त्यांना बोलता येईना काही वेळ थांबून मनोगत व्यक्त करताना कर्जत तालुक्यात काम करताना कुटुंबा सारखा अनुभव आला अनेकांनी सहकार्य केले, पत्रकारांनी अत्यंत चांगले सहकार्य करत सर्वच उपक्रमानां जनते पर्यंत पोहचवले, तर जनतेला ही पोलीस स्टेशन हक्काचे ठिकाण वाटले पाहिजे असे काम करू शकलो यात आनंद असल्याचे सांगत येथील सर्व सामाजिक संघटना व त्याचे काम लक्षात राहण्यासारखे असून माझ्या मुलाला येथे या श्रमदानाच्या नियमित कामात सहभागी होता आले, शिकता आले सर्वांनी त्याला प्रेम दिले हे कधी ही विसरू शकणार नाही असे म्हंटले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस उप निरीक्षक भगवान शिरसाठ यांनी केले यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता प्रशांत वाकचौरे, दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य संजय नगरकर, सहा पोलीस निरीक्षक सतीश गावित, पो उप निरीक्षक अनंत सलगुडे, पो उप निरीक्षक अमरजित मोरे, पदवीधर पत्रकार संघाचे सचिव डॉ अफरोज पठाण, पत्रकार मुन्ना पठाण, प्रेस फोटोग्राफर अण्णा बागल, आदी सह अनेक जण उपस्थित होते.