दादा पाटील महाविद्यालयात ‘स्वसंरक्षण प्रशिक्षण’ कार्यशाळा संपन्न

कर्जत (प्रतिनिधी) :- रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयात शारीरिक तंदुरुस्ती, व्यायाम व निर्भय कन्या अभियान योजनेअंतर्गत ‘स्वसंरक्षण प्रशिक्षण’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत प्रमुख अतिथी म्हणून कराटे आणि वेलनेस कोच श्री. संदीप पांढरकर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर होते.
स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये प्रमुख अतिथी श्री. संदीप पांढरकर यांनी आपल्या मार्गदर्शनात महिलांनी स्वसंरक्षण कसे करावे यासंदर्भात मार्गदर्शन केले. मुलींनी स्वतःचा आत्मविश्वास बाळगून सतत वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला पाहिजे. प्रत्येक महिलेने दुसऱ्या महिलेचा सन्मान केला पाहिजे. मन मेंदू आणि मनगट सशक्त करून महिलांनी स्वतःची प्रगती करण्याकडे लक्ष दिले पाहिजे. शिवाय स्वतःवर जर कठीण प्रसंग आले तर त्यालाही सामोरे जाण्यासाठी कराटे, जुडो यांच्या माध्यमातून स्वसंरक्षण कसे करावे यासंदर्भात मार्गदर्शन केले.
दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. संजय नगरकर यांनी स्त्री-पुरुष समानता ही काळाची गरज असल्याचे नमूद करून महिलांनी सक्षक्त राहण्याचे आवाहन केले. याप्रसंगी शारीरिक संचालक डॉ. संतोष भुजबळ, प्रा. शिवाजी धांडे यांनी ‘व्यायाम’ ही आरोग्याची गुरुकिल्ली कशी आहे हे विविध दाखले देऊन पटवून दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रा. सागर शिंदे यांनी केले .आभार कु.रोहिणी भुते हिने तर सूत्रसंचालन प्रा. किरण भांडवलकर यांनी केले.