मराठा समाजाच्या सहनशक्तीमुळे पिढ्यानपिढ्या बरबाद….. आता बदल घडणाररच ; मनोज जरांगे पाटील

कर्जत (प्रतिनिधी) :- मराठा समाजाच्या सहनशक्तीमुळे पिढ्यानपिढ्या बरबाद झाल्या. पण आता नाही. आता बदल घडवायचाच. आरक्षण मिळविण्यासाठी लढा द्यायचाच. सरकारने एक महिन्याचा वेळ मागितला.
आम्ही ४० दिवस दिले. २४ तारखेपर्यंत सरकारकडे वेळ आहे. जर आरक्षण मिळाले नाही तर ते राज्य सरकारला सोसवणार नाही”, असा इशारा मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. ते शनिवारी सायंकाळी कर्जत येथे सकल मराठा समाज आयोजित महासभेत बोलत होते. यावेळी कर्जतमध्ये जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले. सकल मराठा समाजाचे प्रमुख समन्वयक वैभव लाळगे यांनी पुस्तक भेट देवून त्यांचा सत्कार केला.
या सभेत मनोज जरांगे पाटील म्हणाले, मराठा जातीच्या वेदना पोटतिडकीने मांडतोय.
मराठ्यांना घेरले आहे. पण आता एकत्र आलो आहे. तर सरकारला आरक्षण द्यावेच लागणार आहे. मतभेद बाजूला ठेवून मराठा समाजाने पुढील पिढ्यासाठी आरक्षण घेतलेच पाहिजे. मराठा जात संपविण्याचा विचार झाला असेल तर ती जात मिटवून द्यायची नाही. मराठा समाजासाठी आरक्षण किती गरजेचे आहे, हे संवाद साधून सांगा. आरक्षणासाठी शांततेच युद्ध सुरू आहे. आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार घ्यायची नाही, असे जरांगे पाटील यांनी सांगितले.
राज्य सरकारने नेमलेली समिती काय काम करत आहे. मला माहित नाही. पाच हजार पुरावे समितीच्या अभ्यासकांना सापडले आहेत. मँग अडचण कुठे येते. आधार मिळाला ना. मग कायदा पारित करा. आणि मराठ्यांना सरसकट आरक्षण द्या. ते पण कायमस्वरूपी टिकणार असावे. मागे १९६७ ला एका आधारावर काहींना आरक्षण दिले. मग आम्हाला वेगळा न्याय का? असा सवाल जरांगे पाटील यांनी सरकारला विचारला. आरक्षण नक्की मिळवू, असा विश्वास जरांगे पाटील जनसमुदायास दिला. यावेळी कर्जत सकल मराठा समाजाने सभास्थळी विशेष परिश्रम घेतले होते.