बाळूमामाच्या पालखीत एकावर तलवारीने हल्ला

कर्जत (प्रतिनिधी) :- बाळूमामाच्या पालखी कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत मला काही विचारत नाहीत म्हणून एकाने तलवारीचा वापर करून मारल्याचा प्रकार रेहेकुरी येथे घडला. याप्रकरणी अमोल बाळासाहेब मांडगे यांनी कर्जत पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
अमोल मांडगे यांनी फिर्यादीत म्हटले आहे, आमच्या रेहेकुरी गावात बाळूमामाची पालखी आलेली आहे. मी बाळुमामाच्या पालखी कार्यक्रमात असताना तेथे योगेश लक्ष्मण मांडगे रा. रेहेकुरी हा हातात लोखंडी तलवार घेवून आला व मला म्हणाला, तुम्ही बाळुमामाच्या पालखी कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत मला काही एक विचारत नाहीत. त्याचवेळी त्याने मला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावेळी मी त्यास समजावून सांगत असताना त्याचा त्यास राग आल्याने त्याने मला लोखंडी तलवारीच्या तुंब्याने माझे पाठीत मारुन दुखापत करुन शिवीगाळ केली.
तू लई माजला आहेस, तुला बघुन घेतो असे म्हणुन त्याने मला जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर दिपक मांडगे, अतुल मांडगे यांनी आमची भांडणे सोडविली व योगेश मांडगे हा तेथून पळून गेला. अमोल मांडगे यांच्यावर कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.
याप्रकरणी योगेश मांडगे याच्याविरुद्ध शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम २५, ४ तसेच भादवि कलम ३२४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास कर्जत पोलीस करत आहेत.