अभ्यास, व्यायाम आणि चांगले संस्कार हे यशस्वी जीवनासाठी आवश्यक आहेत ; महेश पाटील
आयुष्याला विनाहोकायंत्राचे जहाज बनवू नका.. महेश पाटील

कर्जत (प्रतिनिधी) :- रयत शिक्षण संस्थेचे, दादा पाटील महाविद्यालय कर्जत येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या वतीने ‘विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद’ या अंतर्गत ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे बदललेले स्वरूप आणि तयारी’ या विषयावर जामखेडचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांचे व्याख्यान संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर हे उपस्थित होते
याप्रसंगी बोलताना महेश पाटील म्हणाले की, प्रतिकूल परिस्थिती होती तरीदेखील पहाटे तीन वाजता उठून अभ्यास करत असल्यानेच माझे अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. अभ्यास, व्यायाम आणि चांगले संस्कार हे यशस्वी जीवनासाठी खूप आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्याचे एक ध्येय निश्चित करा, वाचनातून आयुष्य प्रगल्भ होते त्यामुळे भरपूर वाचन करा. व्यायामामुळे शरीर निरोगी व मन सुदृढ बनते. आयुष्याला विनाहोकायंत्राचे जहाज बनवू नका. आयुष्याचा रस्ता निवडा व त्यानुसार मार्गक्रमण करा. आपल्या आयुष्यात सामाजिक जाणीव ठेवून इतरांना मदत करा. आई म्हणजे एक विद्यापीठ आहे, त्यामुळे आई-वडिलांचा मान राखा. स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी अभ्यासाची उजळणी करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले
अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी सांगितले की, महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी ही या महाविद्यालयाची संपत्ती आहे. आयुष्यात अशक्य असे काही नाही, फक्त आपली दृष्टी महत्त्वाची असावी लागते. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन विद्यार्थ्यांनी बदलला पाहिजे. आजचे सर्व विद्यार्थी अतिशय भाग्यवान आहेत, कारण त्यांना सर्व गोष्टी अगदी सहज उपलब्ध आहेत. वाचनाची गोडी लावून घ्या व आपला दृष्टिकोन व्यापक बनवा. नैराश्यग्रस्त होण्यापेक्षा जी मुले मन लावून अभ्यास करतात ते आयुष्यात एक माणूस म्हणून यशस्वी होतात.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय ठुबे, डॉ. प्रमोद परदेशी, प्रा. राजेश दळवी, प्रा. प्रकाश धांडे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राम काळे यांनी तर आभार डॉ. डी. एस. कुंभार यांनी मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. राजेश दळवी यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक प्रा. संदीप गोंदके व सहकारी सदस्यांनी केले.