कर्जत तालुक्यासह महाराष्ट्राचे भूषण लेखक डॉ. कुमार सप्तर्षी यांना नांदेड येथील प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठानचा पुरस्कार जाहीर

कर्जत (प्रतिनिधी) :- ज्येष्ठ विचारवंत, लेखक डॉ. कुमार सप्तर्षी यांना नांदेड येथील प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठानचा मातोश्री पद्मिनीबाई बन साधना पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी पोपट काळे यांच्या ‘काजवा’ या आत्मकथनाला पुरस्कार दिला जाणार आहे. येत्या शनिवारी ( दि. १) सायंकाळी ५.३० वाजता कोथरुड येथील गांधी भवनच्या सभागृहात ज्येष्ठ सिनेकलावंत डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते या पुरस्कारांचे समारंभपूर्वक वितरण केले जाणार आहे.
नांदेड येथील प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी एका ज्येष्ठ लेखकाला मातोश्री पद्मिनीबाई बन साधना सन्मान तर मराठी भाषेतील उत्कृष्ट पुस्तकाला प्रसाद बन वाड्मय पुरस्कार दिला जातो. पुरस्कारांचे हे २२ वे वर्ष आहे. ११ हजार रुपये रोख, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुणे येथे होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अच्युत बन, बन वाड्मय पुरस्कार समितीचे निमंत्रण डॉ. सुरेश सावंत तसेच संजीव कुळकर्णी यांनी केले आहे.
मुळचे कर्जत तालुक्यातील राशीन येथील असलेल्या डॉ. कुमार सप्तर्षी यांना सामाजिक, साहित्यिक आदी क्षेत्रातील योगदानाबद्दल आतापर्यंत अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांचे ‘येरवडा विद्यापीठातील दिवस’ हे पुस्तक अधिक लोकप्रिय ठरले.१९७० च्या दशकात डॉ. कुमार सप्तर्षी यांना अनेक सामाजिक आंदोलनानंतर तुरुंगवास भोगावा लागला. त्यांनी तुरुंगात घेतलेले अनुभव, वाचन, चर्चा आणि त्यांचा आयुष्यावर झालेला परिणाम याबाबतचे लेखन या पुस्तकात आहे. आम्ही विद्यार्थी आणि आमच्या दंगली, संकल्प, यात्री, अमेरिका स्वप्नांच्या सापळ्यांचा देश : अमेरिका, सत्तातुराणाम, चंद्रशेखर, सत्ता बदलाची दोन वर्षे, धर्माबद्दल अशी अनेक पुस्तके त्यांनी लिहिलेली आहेत. १९९३ पासून ‘सत्याग्रही विचारधारा’ या मासिकाचे संपादन ते करतात.