इस्त्रो परीक्षेत राशीनच्या अंशिका दळवीला सुवर्णपदक; जिल्हा परिषद शाळेच्या १४ विद्यार्थ्यांचे सुयश.


(राशीन प्रतिनिधी जावेद काझी.) :- ऋग्वेद हेल्थ फाउंडेशन, बारामती यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता पहिली ते आठवी ‘इस्त्रो’ (ISRO) परीक्षेत राशीन येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. यामध्ये इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी अंशिका अमोल दळवी हिने सुवर्णपदक पटकावून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
या परीक्षेत राशीन केंद्रातून पहिली ते आठवीचे एकूण १४ विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. या यशाचे स्वरूप खालीलप्रमाणे राहिले:
सुवर्ण: ७ विद्यार्थी तृतीय: ३ विद्यार्थी प्रथम (विभागून): १ विद्यार्थी उत्तेजनार्थ: ३ विद्यार्थी
अंशिका अमोल दळवी हिने प्राथमिक स्तरावरच मिळवलेल्या या सुवर्ण यशामुळे राशीन परिसरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या यशासाठी तिला जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका सौ. शुभदा देशमुख आणि श्रीराम क्लासेसच्या सौ. पुरोहित मॅडम यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

अंशिकाच्या या कामगिरीबद्दल ग्रामस्थ, शिक्षक आणि पालकांकडून तिचे अभिनंदन केले जात असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी अशा स्पर्धा परीक्षेत मिळवलेले यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.



