झाडावर साकारली गणेश मूर्ती सोनमाळी कन्या विद्यामंदिर येथील शिक्षक आशिष निंबोरे यांची अनोखी संकल्पना

कर्जत (प्रतिनिधी) : – देव शोधाया कशाला फिरता गावोगावी जगण्या श्वास देती हीच आपली वृक्षवल्ली
वेगवेगळे आकार आणि अनोख्या संकल्पना गणेश मूर्तीमध्ये आपल्याला नेहमीच पाहायला मिळत आलेल्या आहेत.परंतु महाकाय झाडाच्या खोडावर पर्यावरणपूरक साधनांच्या माध्यमातून गणेश मूर्ती साकारून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी अनोखी संकल्पना कर्जत येथील रयत शिक्षण संस्थेच्या सौ सोनाबाई नामदेवराव सोनमाळी कन्या विद्या मंदिर येथे राबविण्यात आली आहे.
येथील सहशिक्षक आशिष निंबोरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आलेला आहे.झाडाच्या खोडावर शाडूची माती,कागदी पुठ्ठे,झाडाचे पाने,बांबूचे सुप अशा साधनांचा वापर करून आकर्षक गणेश मूर्ती साकारण्यात आली आहे.
झाडात देव आहे असा संदेश याठिकाणी लिहिण्यात आला आहे.आगळ्यावेगळ्या पद्धतीने आणि नाविन्यपूर्ण पद्धतीने साकारण्यात आलेली ही गणेशमूर्ती सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली आहे.परिसरातून मोठ्या प्रमाणावर लोक ही गणेशमूर्ती पाहण्यासाठी आवर्जून येत आहेत.या गणेश मूर्तीच्या सजावटीसाठी कलाशिक्षक रुपाली जगदाळे आणि विद्यार्थिनी स्नेहा कोपनर,श्रेया भोसले,प्रेरणा सोनमाळी,तेजस्विनी शिंदे,प्राजक्ता शिंदे,दीक्षा वाळके आणि इतर सहकारी यांनी सहकार्य केले.विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश भोयटे यांचे मार्गदर्शन या उपक्रमाला मिळाले.
निसर्ग पूजन हीच आपली पारंपरिक संस्कृती असून त्यातूनच पर्यावरण संवर्धन होऊ शकते.शालेय परिसरात दर्शनी भागात ही गणेश मूर्ती साकारण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये वृक्षसंवर्धनाची प्रेरणा निर्माण होणार आहे.-आशिष निंबोरे,सहशिक्षक