
कर्जत (प्रतिनिधी):- आपल्या कवितांना उपस्थित प्रेक्षकांना अंतर्मुख करत विचार करायला भाग पाडणाऱ्या कवी अनंत राऊत यांनी आपल्या प्रसिद्ध कविता बरोबर मांडलेले विचार ऐकताना कधी टाळ्या वाजवत दाद देणारे प्रेक्षक निशब्द होऊन विचार करू लागले हे कळलेच नाही.
श्री संत अमरसिंह विद्या प्रतिष्ठान कर्जत व राष्ट्रवादी चित्रपट कला साहित्य सांस्कृतिक विभाग कर्जत तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती उत्सव साजरा करण्यात आला, यानिमित्ताने महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी, लेखक, व्याख्याते, अनंत राऊत यांच्या काव्यात्मक प्रबोधन या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन आमदार रोहित पवार यांच्या सहकार्यातून करण्यात आले होते. कर्जत मधील शिक्षक कॉलनी मध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी बोलताना कवी अनंत राऊत यांनी आपल्या गाजलेल्या कवितांच्या माध्यमातून आणि आपल्या जबरदस्त शब्दसंवादातून महापुरुषांचे कार्य विशद केले. आपल्या सगळ्याच महापुरुषांनी समाजाला समतेचा संदेश देण्याचे काम केले आहे, सुवर्ण इतिहास दिलेला आहे. तो वारसा आपण पुढे चालवला पाहिजे. काळाची गरज ओळखून विचारपूर्वक आपले प्रत्येक पाऊल टाकले पाहिजे असे त्यांनी सांगताना मायबाप ही अत्यंत वास्तव दाखवणारी कविता सादर करताना अनेकांच्या डोळ्यात पाणी आणले. ज्या कवितेने राऊत यांना राज्यात ओळख निर्माण करून दिली त्या मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा या कवितेतून प्रत्येकाच्या आयुष्यात मित्र किती महत्वाचा असतो हे विशद केले.
राजकरनावर अत्यंत मार्मिक भाष्य करताना भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय…. नेता गाजलाय या रचनेने लोकांना हसवत सद्याच्या राजकारणावर अत्यंत सुंदर विवेचन केले.
राऊत यांनी सादर केलेल्या कविता उपस्थितांच्या काळजाला भिडत गेल्या. यात दोन तास कसे गेले हे कळले व कोणीही कार्यक्रमातून हालले नाही.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कवयित्री स्वाती पाटील यांनी केले. तर राजेंद्र फाळके आणि नामदेव राऊत यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक नेवसे सर यांनी केले. शेवटी संयोजक श्री संत अमरसिंह विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष व नगरसेवक भाऊसाहेब तोरडमल यांनी आभार मानले. मंचावर हिरामण येळपणेकर व दिगंबर कोरडे तसेच कार्यक्रमाला कर्जत शहरातील व प्रभाग क्रं 8 मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.