उषा राऊत नगराध्यक्षा पदाचा राजीनामा देणार नामदेव राऊत यांनी महासंग्राम युवा बैठकीच्या वेळी केले स्पष्ट

समृध्द कर्जत/(प्रतिनिधी) : -जी घटना घडली नाही त्याला खतपाणी घालण्याचे काम केले जात आहे. ज्या नगरपंचायती मी उपस्थित होतो, त्यावेळचे व्हिडिओ व पुरावे उपलब्ध आहेत. मी शिवीगाळ केल्याचे अगोदर सांगतात व रात्री विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येतो. या प्रवृत्ती विरोधात मला काम करायचे आहे.
असे नगरसेवक नामदेव राऊत यांनी महासंग्राम युवा मंचाच्या वतीने भारती स्कूल येथे घेण्यात आलेल्या बैठकीत बोलताना स्पष्ट केले.
कार्यकर्ते च्या बैठकीत बोलताना पुढे राऊत म्हणाले की, सर्व पुरावे असतानाही कोणीतरी काही करायला लावत आहे, तो कोण आहे हे शोधून काढून लोकांसमोर तो चेहरा आणण्याचे काम मी करणार आहे, अशी स्पष्टोक्ती कर्जत नगरपंचायतीचे नगरसेवक नामदेव राऊत यांनी महासंग्राम युवा मंचच्या बैठकीत केली. राऊत यांच्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ ‘महासंग्राम’च्या वतीने प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
राऊत पुढे म्हणाले, जिवाभावाचे कार्यकर्ते हीच माझी संपत्ती आहे. मी इथे कोणालाही कॉल करून बोलावले नाही. नगरसेवकांनाही बोलावले नाही. तरीही तुम्ही माझ्यावर प्रेमापोटी येथे येवून आपली भूमिका मांडली आहे. नगरपंचायत कार्यालयातील कर्मचारी, महिला यांनी सत्याच्या मागे उभे राहत पोलिसांना निवेदन दिले. मात्र माझ्या दृष्टीने हा विषय आता संपला आहे. यापुढे महासंग्राम युवा मंच बळकट करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना साथ देण्यासाठी मी ताकदीने काम करणार आहे. तुम्ही कोणत्याही पक्षात राहा, मी तुमच्या सुखदुःखात सहभागी होतो. याच गोष्टीमुळे तुम्ही आत्तापर्यंत मला साथ दिलेली आहे.
या बैठकीसाठी रोहन कदम, प्रसाद शहा, सुरेश भिसे, आण्णा मेहेत्रे, भुषण ढेरे, संपत बावडकर, शरीफ पठाण, शिवकुमार सायकर, रामकिसन साळवे, अमृत काळदाते, रविंद्र सुपेकर, विश्वास डमरे, रामदास हजारे, महादेव सुरवसे, नामदेव थोरात, भरत मासाळ, सतिश समुद्र, राजेंद्र खराडे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.