अण्णा भाऊ साठेंचे भव्य स्मारक उभारणार.
आ. रोहित पवार : शासनाने निधी न दिल्यास कर्जत-जामखेडची जनता देईल

कर्जत (प्रतिनिधी) :- लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकासाठी दोन वर्षांपूर्वी शासनाने २५ कोटी रुपये जाहीर केले, मात्र स्मारकासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने योग्य मोबदला देऊ केलेला नाही. शासनाने याबाबत योग्य तोडगा काढला नाही, तर कर्जत- जामखेडची जनता आणि माझ्याकडून स्मारकासाठी आवश्यक तो निधी दिला जाईल आणि भव्य आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभे केले जाईल, असे आश्वासन आमदार रोहित पवार यांनी दिले.
वाटेगाव (ता. वाळवा) येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारक भवन व निवासस्थानास आमदार पवार यांनी मंगळवारी कर्जत- जामखेड येथील ४ हजार समर्थकांसह भेट देऊन अर्धपुतळ्यास अभिवादन केले. त्यांनी अण्णा भाऊंच्या निवासस्थानासही भेट दिली. यावेळी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्यास्नूषा सावित्रीबाई साठे, सरपंच नंदा चौगुले उपस्थित होत्या. आमदार पवार म्हणाले,
बाटेगावसारख्या ऐतिहासिक भूमीमध्ये आम्ही आज आलो, याचा आम्हाला अभिमान आहे. स्मारकासाठी ट्रस्ट निर्माण करून खात्यावर रकम जमा केली जाईल. त्यांनी निवासस्थानासाठी १५ लाखांचा निधी जाहीर केला व निवासस्थान सुसज्ज करण्याचे आश्वासन कुटुंबीयांना दिले. यावेळी आमदार पवार यांनी शिल्पसृष्टीची पाहणी केली. वाटेगाव ग्रामपंचायत व अण्णा भाऊंच्या कुटुंबीयांच्यावतीने आमदार पवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. भूषण चौगुले, ग्रामपंचायत सदस्य समीर जाधव, प्रतिभा देसाई, प्रदीप देशमुख, जनार्दन साठे, दिनेश जाधव, सुनील खराडे, प्रभाकर साठे, ग्रामविस्तार अधिकारी शुभांगी भारती आदी उपस्थित होते.