कर्जत शिक्षणाचे केंद्र बनले आहे…खा. शरदचंद्रजी पवार.

कर्जत (प्रतिनिधी) :- महात्मा गांधी विद्यालयाचा अमृत महोत्सव प्रारंभ, दादा पाटील महाविद्यालय कर्मवीर जयंती सप्ताह व हीरक महोत्सव सांगता व विद्यार्थिनी वसतिगृह विस्तारित इमारत उद्घाटन समारंभ दादा पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. खा. शरदचंद्रजी पवारसाहेब हे समारंभाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन मा. चंद्रकांत दळवी (भा.प्र.से.), व्हा.चेअरमन मा.ॲड. भगीरथ शिंदे, संघटक मा.डॉ.अनिल पाटील संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य मा. दादाभाऊ कळमकर, मा. मीनाताई जगधने, संस्थेचे सचिव मा. विकास देशमुख, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू प्रिं.डॉ. ज्ञानदेव म्हस्के, रयत शिक्षण संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव प्रिं.डॉ. शिवलिंग मेनकुदळे, लेखापरीक्षक विभागाचे सहसचिव प्रिं.डॉ. राजेंद्र मोरे, मा. प्राचार्य शिवाजीराव भोर तसेच रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष मा. राजेंद्रतात्या फाळके, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य आमदार रोहित पवार, मा.अंबादास पिसाळ, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मा. बप्पा धांडे. रयत शिक्षण संस्थेचे विविध पदाधिकारी, जनरल बॉडी व मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, विविध शाळा महाविद्यालयांचे शाखाप्रमुख तसेच रयतप्रेमी मान्यवर, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.
रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या हस्ते हवेत ७५ फुगे सोडून महात्मा गांधी विद्यालयाचा अमृत महोत्सवाचा प्रारंभ करण्यात आला.दादा पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी वसतिगृहाच्या विस्तारित इमारतीचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या हस्ते करण्यात आले. हीरक महोत्सवानिमित्त महाविद्यालयाच्या कर्मज्योती ‘हिरकणी’ विशेषांकाचे प्रकाशन खा.शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन तयार करताना मा.खा. शरदचंद्रजी पवार म्हणाले, कर्तृत्ववान पिढी तयार करण्याचे काम कर्जत भागातील जनतेने स्वीकारल्याने या भागाचा शैक्षणिक विकास झालेला आहे. कर्जत हे शिक्षणाचे केंद्र झाले आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे पाय या परिसराला लागले, व्यापक हिताचे निर्णय घेणारे लोक ओळखणे हे कर्मवीर भाऊराव पाटील यांचे कौशल्य होते. कर्मवीरांचा आदर्श पायवाट स्वीकारून दादा पाटील यांनी काही सहकार्यांना सोबत घेऊन कर्जत व परिसरामध्ये शिक्षणाचे रोपटे रोवले. दादा पाटील व या परिसरातील लोक जे काम करायचे त्याची माहिती आबासाहेब निंबाळकर यांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचत असल्याचे शरदचंद्रजी पवार यांनी सांगितले. शाळा महाविद्यालयाच्या नुसत्या इमारती चांगल्या असून चालत नाही तर त्या ठिकाणचा शैक्षणिक दर्जा ही चांगला असायला हवा. सध्या मुलांपेक्षा मुलींचे शिक्षण घेण्याचे प्रमाण जास्त आहे. दादा पाटील महाविद्यालयाचा निकाल हा विद्यापीठाच्या निकालापेक्षा सरस आहे. या ठिकाणचा शिक्षक वर्ग याकरिता कष्ट घेत आहे. आज सर्व क्षेत्रांमध्ये कर्तृत्वान मुले मुली घडली पाहिजेत. इथून पुढे या कर्जतच्या रयत संकुलामध्ये जे काही सहकार्य लागेल ते रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून दिले जाईल असे त्यांनी यावेळी आश्वासित केले. याप्रसंगी आपले विचार व्यक्त करताना रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय समितीचे सदस्य मा.आ. रोहितदादा पवार यांनी कर्जत तालुक्यातील सामान्य लोकांनी वर्गणी गोळा करून रयत शिक्षण संस्थेचे हे कर्जत मधील संकुल उभारलेले आहे. आज ७५ हजारापेक्षा जास्त विद्यार्थी या महाविद्यालयामधून शिकलेले आहेत. मुलांचे वसतिगृह व्हावे यासाठी भविष्यात मी प्रयत्न करेल असे त्यांनी सांगितले
याप्रसंगी आपले विचार व्यक्त करताना रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य मा.खा. निलेश लंके यांनी सांगितले की, रयत शिक्षण संस्थेच्या उभारणीमुळे बहुजन मुले शिकली आहेत. रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी असल्यामुळेच आज मी खासदार आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यानंतर शरदचंद्रजी पवारसाहेबांनी रयत शिक्षण संस्थेची कारकीर्द उंचावत ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे या प्रसंगी आपले विचार व्यक्त करताना रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन मा. चंद्रकांत दळवी साहेब यांनी सांगितले की, रयत शिक्षण संस्थेच्या मुख्यालयाच्या ठिकाणीही नाही असे चांगले सभागृह कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयांमध्ये उभारले गेले आहे. दादा पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी दुष्काळी भागातला चेहरा बदलला आणि या ठिकाणी शिक्षणाचे महत्वपूर्ण कार्य केले. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी भौतिक सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे. इथून पुढे ई लर्निंग मध्ये शिक्षण घेणे गरजेचे झाले आहे. रयत शिक्षण संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांना संगणकीय शिक्षण सुरू व्हावे अशी भूमिका रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवारसाहेबांची आहे. रयत शिक्षण संस्थेच्या सर्व शाळा महाविद्यालयांमध्ये इंटरऍक्टिव्ह पॅनल बसविण्यात येणार असल्याचे सांगितले. रयत शिक्षण संस्थेमधील पहिले एन.सी.सी युनिट कर्जत महाविद्यालयामध्ये सुरू झाले. सातारा येथील रयत जयंतीच्या शोभायात्रेत कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयाचे एन.सी.सी युनिट नेतृत्व करत असल्याचे सांगितले.महाविद्यालयाच्या हिरकणी विशेषांकाकरिता सर्वाधिक जाहिराती संकलित केल्याबद्दल प्रा. प्रकाश धांडे, डॉ. संजय चौधरी, श्री. विलास मोढळे, श्री.नंदू पवार, श्री. शिवाजी बोळगे यांचा सन्मान शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या हस्ते घेण्यात आला.पिंपळवाडी येथील उद्योजक भाऊसाहेब जंजिरे यांनी वडिलांच्या हस्ते दोन लाख रुपये गरीब विद्यार्थी फंडास दिले , प्रकाश धांडे यांनी ५१ हजार बापूराव बन्सी जंजिरे दोन लाख, श्री. दिपकशेठ शिंदे एक लाख रुपये, संतोष सुदाम निंबाळकर ५१ हजार, यांनी दादा पाटील महाविद्यालयाच्या गरीब विद्यार्थी फंडासाठी देणगी दिली. महात्मा गांधी विद्यालयाच्या निवृत्त रयत सेवकांनी एक लाख ११ हजार महात्मा गांधी शाळेला व सौ. सो. ना. सोनमाळी कन्या विद्यामंदिरला श्री. सुरेश भोईटे यांनी एक लाख रुपये देणगी दिल्याबद्दल शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. उपस्थित सर्व मान्यवरांना एन.सी.सी. विभागाच्या वतीने ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात आला. याप्रसंगी दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व महाविद्यालयाने ६० वर्षात केलेल्या शैक्षणिक प्रगतीचा अहवाल मांडला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्रतात्या फाळके तर आभार प्राचार्य राजकुमार चौरे यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ. प्रतिमा पवार, प्रा. राम काळे, प्रा. स्वप्नील म्हस्के यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.