दादा पाटील महाविद्यालयात महिला दिनानिमित्त ‘वीर माता व वीर पत्नी सन्मान सोहळा’ संपन्न

कर्जत (प्रतिनिधी) :- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दादा पाटील महाविद्यालयामध्ये ‘तेजश्विनी मंच’ च्या वतीने ‘वीर माता व वीर पत्नी सन्मान सोहळा’ महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून काकडे हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. विद्या काकडे उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर होते
समाजामध्ये आणि अशा वीर माता आणि वीर पत्नी आहेत की ज्यांनी आपला मुलगा किंवा पती समाजसेवेसाठी, देशसेवेसाठी बलिदान दिला आहे अशांचा सन्मान व्हावा या हेतूने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांच्या कल्पकतेतून तेजस्विनी मंचमार्फत या सन्मान सोहळ्याचे विशेष आयोजन केले होते
या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये महाविद्यालयाचे विद्यमान प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी सांगितले की, भारत देश हा सुरुवातीला मातृसत्ताक पद्धती असलेला देश होता. मात्र दरम्यानच्या काळामध्ये आपला देश पितृसत्ताक बनला आणि वेगवेगळ्या प्रथा, परंपरा दृढ झाल्या. काळाच्या ओघात स्त्रियांना दुय्यम वागणूक दिली जाऊ लागली. समाजपरिवर्तन आणि समाजप्रबोधनातून अलीकडच्या काळामध्ये स्त्रियांना सन्मानाची वागणूक द्यायला सुरुवात झाली आहे. कृषी संस्कृतीचा शोध स्त्रीने लावला आहे. महिला दिनानिमित्तच फक्त स्त्रियांचा सन्मान करणे उचित ठरणार नाही तर वर्षभर त्यांचा सन्मान व्हायला हवा अशी भावना व्यक्त केली. महाविद्यालयातील तेजस्विनी मंचामार्फत वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून स्त्रियांना वर्षभर महाविद्यालयामार्फत सन्मान दिला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्या डॉ. विद्या काकडे यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले की, स्त्रियांना पूर्वीपासूनच समाजामध्ये मानाचे स्थान आहे. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रिया सहभागी होत आहेत. परकीय आक्रमणापासून संरक्षण मिळावे म्हणून महिलांवरती बंधने आणली गेली. स्त्रियांनी स्वतःचे संरक्षण स्वतः केले पाहिजे. स्त्री-पुरुष एकमेकांना पूरक असले पाहिजे. स्त्रियांना मूलभूत अधिकार मिळाले पाहिजेत. स्त्रियांनी देखील आपल्या मर्यादेत वर्तन केले पाहिजे. स्त्रिया सहनशील आहेत, स्त्रियांच्या कामाचे मूल्यमापन केले पाहिजे, स्त्रियांचा आत्मसन्मान केला पाहिजे. स्त्रियांनी आत्मनिर्भर बनले पाहिजे, शिवाय स्त्रियांनी समाजात वावरताना न्यूनगंड बाळगू नये. स्त्री जन्माचे आपण सर्वजण स्वागत करा असा आशावाद त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला.
या कार्यक्रमामध्ये अश्विनी बारटक्के, मनीषा घोडके, सुप्रभात घोरपडे, सारिका सुरवसे, लता म्हेत्रे, सोनवणे ताई या वीर माता व वीर पत्नींचा सन्मान महाविद्यालयामार्फत करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व महिला प्राध्यापकांचा महाविद्यालयाचे प्राचार्य व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला पत्रकार गणेश जेवरे, दिलीप अनारसे उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तेजस्विनी मंचच्या समन्वयक डॉ. माधुरी गुळवे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्वप्निल म्हस्के यांनी तर आभार वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. भागवत यादव यांनी मानले