राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांवर सूडबुद्धीने झालेले गुन्हे मागे घ्या

कर्जत (प्रतिनिधी) :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांवर सूडबुद्धीने झालेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी कर्जत तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन कार्यकर्त्यांनी ही मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, समाजमाध्यमातून कर्जत शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस सचिन पोटरे यांची काही कार्यकत्यांशी बाचाबाची झाल्याचे समजले. वास्तविक पाहता भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी हे सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आ. रोहित पवार तसेच आम्ही इतर पदाधिकारी यांचेविषयी अर्वाच्च, आक्षेपार्ह टीका टिपण्णी समाजमाध्यमातून करत असतात, याविषयी वादाचे बरेचसे प्रसंग यापूर्वीही घडले आहेत. राजकारण करत असताना कोणतीही टीका टिप्पणी कोणाही वैयक्तिक व्यक्तीवर करण्यात येऊ नये असे असतानाही हे पदाधिकारी सातत्याने वैयक्तिक पातळीवर टीका करत असतात. अशाच काही कारणातून यावेळीही त्यांच्याशी कार्यकत्यांची बाचाबाची होऊन त्याचे पर्यावसान मारहाणीत झाले असावे.
यामध्ये काही संबंधितांवर गुन्हेही दाखल झाल्याचे समजते आहे. परंतु यातील समाविष्ट नावांमध्ये सुधीर रामदास यादव यांचे नाव घेतले आहे. ही व्यक्ती प्रतिष्ठित असून केवळ राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे व आ. रोहित पवार यांचे काम करत असल्याने व राजकारणातून त्यांचेवर रोष ठेवून विधानपरिषदेचे आ. राम शिंदे यांचे सांगण्यावरून त्यांचे नाव या प्रकरणात घेतले आहे.
ही व्यक्ति या घटनेवेळी त्याठिकाणी उपस्थित नसतानाही केवळ त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना नाहक त्रास देण्याच्या उद्देशाने त्यांचे नाव गुन्ह्यात घेतले आहे. याकामी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कर्जततर्फे जाहिर निषेध नोंदवितो. सुधीर यादव यांचे या प्रकरणात नाहक गोवलेले नाव वगळावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन धांडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनला निवेदन देऊन केली आहे.