दादा पाटील महाविद्यालयात ‘बारावी नंतर पुढे काय’ या विषयावर कार्यशाळा

समृध्दकर्जत (प्रतिनिधी) :- “विद्यार्थ्यांनी श्रम संस्कारांपासून स्वतःच्या करिअरला प्रारंभ केला पाहिजे. शिक्षण घेतानाच विद्यार्थ्यांना विविध प्रश्न पडले पाहिजेत, जे प्रश्न विद्यार्थ्यांच्या भवितव्याला दिशा देत असतात” असे प्रतिपादन करिअर मार्गदर्शक तज्ञ विवेक वेलनकर यांनी व्यक्त केले.
रयत शिक्षण संस्थेचे दादा पाटील महाविद्यालय कर्जत येथे कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत शॉर्ट टर्म कोर्सचा उद्घाटन समारंभ व ‘बारावीनंतर पुढे काय’ या विषयावरती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले होते. या कार्यशाळेकरिता कनिष्ठ महाविद्यालयात शिकणारे सर्व विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर होते
याप्रसंगी बोलताना वेलणकर यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी अकरावी मध्ये प्रथमता: विषयांची निवड करणे महत्त्वाचे आहे. तसेच विविध परीक्षांची तयारी करताना आपल्या मेंदूचा पूर्ण क्षमतेने वापर करावा. रोजच्या रोज अभ्यास करत त्याची उजळणी आठवड्याच्या शेवटी करावी. अभ्यास करताना मोबाईल पूर्णता: बंद असावा आणि प्रचंड कष्ट करण्याची गरज विद्यार्थ्यांमध्ये असावयास हवी असे सांगितले.
अध्यक्षीय मनोगतामध्ये प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या आतील राजहंस बाहेर काढण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रमाची नितांत आवश्यकता आहे म्हणूनच अशा कार्यशाळा महाविद्यालयात आयोजित केल्या जातात. विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग अभ्यासामध्ये करून प्रचंड भरारी घ्यावी. विद्यार्थ्यांच्या समुपदेशनाकरिता महाविद्यालय अनेक कार्यशाळा आयोजित करत आहे, त्याकरिता शिक्षक पालक संघ स्थापन करण्याची घोषणा प्राचार्य डॉ. संजय नगरकर केली.
याप्रसंगी राहुल नवले, प्रवीण पवार, जयश्री धांडे, सारिका कदम आदि पालकांनी महाविद्यालय राबवित असलेल्या विविध उपक्रमाचे कौतुक केले.
दोन सत्रांमध्ये ही कार्यशाळा संपन्न झाली. द्वितीय सत्राचे अध्यक्षस्थान उपप्राचार्य डॉ. प्रमोद परदेशी यांनी सांभाळले. तर प्रास्ताविकपर मनोगत प्रा. सुनील देशमुख, प्रा. राजेश दळवी यांनी तर आभार डॉ. संजय ठुबे व प्रा. वसंत आरडे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. किरण भोसले, प्रा. सुशीला देशमुख व प्रा. संगीता भोसले यांनी केले.
या कार्यशाळेकरिता महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी वर्ग व बहुसंख्येने पालक वर्ग उपस्थित होता