दादा पाटील महाविद्यालयात डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम जयंती व वाचन प्रेरणा दिन साजरा

कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत येथील रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयात सांस्कृतिक व मराठी विभागाच्या वतीने डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या जयंती व वाचन प्रेरणा दिनानिमित्त व्याख्यान, पुस्तक वाचन व पुस्तक परीक्षण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी ग्रंथपाल प्रा. बबन कुंभार यांनी ‘वाचनाचे महत्त्व’ या विषयावर आपले विचार व्यक्त केले. ग्रंथ हे गुरु असतात, त्यामुळे वेगवेगळ्या भाषेतील व विविध विषयांची पुस्तके विद्यार्थ्यांनी वाचावीत. चांगल्या पुस्तकातून संभाषण, मानसिक क्षमता वाढते शिवाय अद्ययावत ज्ञानही मिळते. वाचनातून मिळविलेले ज्ञान तुम्हाला सर्व प्रकारच्या संकटातून वाचू शकते, असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यामागील भूमिका विशद केली. विद्यार्थी पाठ्यपुस्तकां व्यतिरिक्त अवांतर वाचनाकडे काहीसे दुर्लक्ष करत असल्याची खंत व्यक्त केली. अभ्यासेतर पुस्तकातूनच बरीच ऊर्जा मिळत असते. पुस्तके जीवनाचा मूलमंत्र सांगत असतात. संघर्ष वाट्याला आलेल्या माणसाची कहाणी वाचली तर त्यातून विद्यार्थ्यांना. उच्च ध्येय संपादन करण्याची प्रेरणा मिळते. महात्मा फुले यांना थॉमस पेन यांचे ‘राइट्स ऑफ मॅन’, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना केळुस्कर गुरुजींनी दिलेले बुद्ध चरित्र यातून प्रेरणा मिळाल्याचा दाखला यावेळी त्यांनी सांगितला. एक होता कार्व्हर, झोंबी, अग्निपंख, किरण बेदींची पुस्तके आदि शेकडो प्रेरणादायी पुस्तके विद्यार्थ्यांनी वाचलीच पाहिजेत असे नमूद केले
व्याख्यानपर कार्यक्रमानंतर उपस्थित विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागातील अनिल गांगुर्डे, नंदू पवार, मुन्ना शेख, दीपाली भैलुमे यांच्या माध्यमातून प्रेरणादायी पुस्तके वाचनासाठी व परीक्षणासाठी देण्यात आली. या पुस्तक परीक्षण स्पर्धेमध्ये ५७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमाला प्रा. सुनील देशमुख, प्रा. प्रतापराव काळे, प्रा. मीना खेतमाळीस, प्रा. वृद्धेश्वर गरुड, प्रा. संगीता पवार, प्रा. सुशीला देशमुख, प्रा. विशाल शेळके आदि प्राध्यापक व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभागप्रमुख व उपप्राचार्य डॉ. प्रमोद परदेशी यांनी तर आभार मराठी विभागप्रमुख प्रा. सुखदेव कोल्हे यांनी मानले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. भारती काळे यांनी केले